देवळाली पॅसेंजर पूर्ववत सुरू करण्याची मागणी : चौथ्या मार्गानंतर अनेक रेल्वेगाड्या धावणार
भुसावळ- रेल्वे स्थानक स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या चंबल सिक्युरिटी या कंपनीने 120 कर्मचार्यांचे वेतन व पीएफ त्वरीत देण्यात यावे यानंतरच संबंधित ठेकेदाराची अनामत रक्कम परत करावी.तसेच नवीन ठेकेदाराने संबंधित 21 कामगारांंना कामावरुन कमी केले असून त्यांना पुन्हा कामावर घेण्याबाबत रेल्वे प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला सूचना द्यावी, असे खासदार ए.टी.पाटील यांनी डीआरएम याना सांगितले.
कंपनीवर बंधन घालता येणार नाही -अधिकार्यांचा खुलासा
चंबल सिक्युरिटी कंपनीच्या ठेकेदाराने पगार व पीएफच्या रक्कमा संबंधित कर्मचार्यांच्या खात्यावर त्वरीत जमा करण्यासंदर्भात खासदार ए.टी.पाटील यांनी डीआरएम आर.के. यादव व संबंधित अधिकार्यांशी सोमवार, 2 रोजी चर्चा केली. यावेळी अधिकार्यांनी चंबल सिक्युरिटी कंपनीच्या कर्मचारी संबंधातील माहिती आपल्याकडे आली नसल्याने संबंधित कंपनीची अनामत रक्कम अद्याप कंपनीला अदा केलेली नाही. संपूर्ण माहिती आपल्याकडे जमा झाल्याशिवाय अनामत रक्कम परत दिली जाणार नसल्याचे अधिकार्यांनी सांगितले तसेच नवीन एच.एस.सर्व्हिसेस कंपनीने जुन्या 21 कामगारांना त्वरीत कामावर घेण्याबाबत ही सुचना केली मात्र संंबंधित कर्मचार्यांना कामावर परत घेण्यासाठी कंपनीवर बंधन घालता येणार नसल्याचे अधिकार्यांनी सांगितले मात्र याबाबत कंपनीला सुचना देण्याचे आश्वासन अधिकार्यांनी दिले.
या अधिकार्यांची होती उपस्थिती
यावेळी एडीआरएम मनोज सिंन्हा, सिनीअर डीओएम स्वप्नील लीला, सीनीअर डीसीएम सुनील मिश्रा, सीनीअर डीएमई सुदीप प्रसाद, डीआरयूसीसी सदस्य अनिकेत पाटील, डॉ.नि.तु.पाटील, अमोल जाधव, जीवन चौधरी, प्रीतम राणे आदी उपस्थित होते.
रेल्वेतील कर्मचारीच आहेत ठेकेदार
नवीन कंपनीचा ठेका रेल्वेतील कर्मचारीच चालवत असल्याचे यावेळी खासदार ए.टी.पाटील यांच्या लक्षात आणून दिले. मात्र याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे अधिकार्यांनी सांगितले. याबाबत सखोल माहिती घेवून कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.
राजधानी एक्सप्रेस भुसावळमार्गे धावणार
भुसावळ विभागात तिसर्या व चौथ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर भुुसावळ विभागातून आणखी नवीन गाड्या सुरू होतील. त्यात राजधानी एक्स्प्रेसचाही समावेश असणार आहे. पी.जे. रेल्वेच्या विस्तारीकरणाला मंजुरी मिळालेली आहे मात्र नवीन रेल्वे मार्गांचा 10 वर्षांचा कार्यक्रम असल्याने सद्यस्थितीत हे काम प्रलंबित आहे. चार वर्षापासून रेल्वेत गतीमान पद्धतीने कामे सुरू आहेत. रेल्वेकडे सात लाख कोटींची कामे आहेत मात्र रेल्वे वर्षाला 50 हजार कोटींची कामे करु शकते. यामुळे विलंबाने का होईना विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती खासदार ए.टी.पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गाड्यांना तात्पुरता थांबा द्यावा
वाराणसी व देवळाली स्थानकावर रेल्वेची विकासकामे सुरू असल्याने काही गाड्यांच्या फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. परीणामी चाकरमाने, कर्मचारी, व व्यावसायीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे या मार्गावर गीतांजली एक्सप्रेसला पाचोरा व चाळीसगाव स्थानकांवर तर महाराष्ट्र एक्सप्रेसला म्हसावद स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात यावा. यामुळे प्रवाशांना सुविधा होवून त्यांच्या अडचणी कमी होतील. देवळाली पॅसेंजर बंद करण्याची आवश्यकता नव्हती ती का बंद केली? शक्य असल्यास ती पुर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.