कोलंबो: भारतीय क्रिकेटला सध्या सुगीचे दिवस आहेत असे म्हणायला हरकत नाही. थिरुश कामिनी (नाबाद ११३) आणि दीप्ती शर्मा (८९) यांच्या दमदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने आयसीसी महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेत आयर्लंड महिला संघावर १२५ धावांनी विजय मिळवला. भारताने ‘अ’ गटात सलग तिसरा विजय मिळवून अव्वल सहा संघांमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. भारताच्या २५० धावांचा पाठलाग करताना आर्यलडचा संपूर्ण संघ ४९.१ षटकांत १२५ धावांत माघारी परतला.
पहिल्या विकेटसाठी १७४ धावांची भागीदारी
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला दीप्ती आणि थिरुश यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी १७४ धावांची भागीदारी करताना भारताचा पाया मजबूत केला. किम गर्थने ४०व्या षटकात दीप्तीला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. दीप्तीने १२८ चेंडूंत १० चौकार आणि १ षटकार लगावत ८९ धावा केल्या. त्यानंतर थिरुशने सर्व सूत्रे हाती घेत भारताला समाधानकारक पल्ला गाठून दिला. थिरुशने १४६ चेंडूंत ११ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार खेचून नाबाद ११३ धावांची खेळी साकारली. भारताने ५० षटकांत उभ्या केलेल्या २ बाद २५० धावांचा पाठलाग करणाऱ्या आर्यलडला हे आव्हान झेपले नाही. शिखा पांडे, पूनम यादव, एकता बिस्ट आणि देविका वैद्य यांच्या अचूक गोलंदाजीसमोर आर्यलडचे फलंदाज झटपट माघारी परतले. इसोबेल जॉयस (३१) आणि गॅबी लेवीस (३३) यांनी थोडाफार संघर्ष केला.