कामे न करताच कोट्यवधींच्या निधीवर ठेकेदारासह अधिकार्‍यांनी मारला डल्ला : आमदार एकनाथराव खडसे

In the Muktainagar constituency, funds of crores of rupees were squandered by officials and contractors without doing any work मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामे न करता बिले अदा करण्यात आल्याचा आरोप माजी मंत्री व विधान परीषदेचे आमदार एकनाथराव खडसे व जिल्हा परीषदेचे माजी सदस्य सुभाष पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी खडसे फार्मवर आयोजित पत्रकार परीषदेत केला.

सार्वजनिक बांधकाम विभागावर साधला निशाणा
गेल्या सात ते आठ महिन्यांपूर्वी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे व जिल्हा परीषदेचे माजी सदस्य सुभाष पाटील यांनी यासंदर्भात तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीत वढोदा-मच्छिंद्रनाथ हा रस्ता तीन कोटी 20 लक्ष रुपये, कोथळी ते वडवे चांगदेव रस्ता चार कोटी पन्नास लक्ष व उमरा ते जोंधणखेडा हा दीड कोटी च्या रस्त्याच्या कामांची बिले काढण्यात आली असून कोणत्याही प्रकारचे काम न करता परस्पर बनावट व खोटी बिले बांधकाम विभागाला सादर करून बांधकाम विभागाचे अधिकारी गणेश पाटील, इमरान शेख व रवींद्र परदेशी व मक्तेदार उज्वल बोरसे यांनी अपहार केल्याची तक्रार करण्यात आली होती. या संदर्भात चौकशीचे आदेशही देण्यात आले होते. गुणवत्ता विभाग, नाशिक यांनी चौकशीदेखील केली असून त्यात तथ्य आढळून आले असून त्यांच्याविरुद्ध कोणतेही कारवाई अद्याप येतो करण्यात आलेली नाही. यात अधिकार्‍यांची बदली करण्यात आली मात्र राजकीय दबावामुळे या अधिकार्‍यांवर बांधकाम विभागाच्या अव्वर सचिव पूजा उदवंत यांनी कारवाई थांबवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा हा प्रकार असून त्याविरुद्ध न्यायालय, औरंगाबाद येथे रीट याचिका क्रमांक 6495/2022 ही 12 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आली असून यात सुनावणी होऊन तथ्य देखील आढळल्याचे सांगण्यात आले.

कामाचे थर्ड पार्टी ऑडीटची मागणी
न्यायालयाने या प्रकरणात अवर सचिव पूजा उदवंत तसेच कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, इब्राहिम शेख, गणेश पाटील आणि मक्तेदार उज्वल बोरसे यांना नोटीस बजावली असून बोरसे याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने 20 ऑक्टोबरपर्यंत आपले म्हणणे मांडावे, असे बांधकाम विभागाला आदेश दिले आहेत तसेच या सर्व कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करून चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणीदेखील पत्रकार परीषदेत करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी प्रलंबित प्रकल्पांना द्यावी गती
मुक्ताईनगरात 20 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येत असल्याने विकासासाठी प्रलंबित असलेली कामे मार्गे लागतील, अशी अपेक्षा खडसेंनी व्यक्त केली. कुर्‍हा आणि बोदवड उपसा सिंचन, वरणगाव उपसा सिंचन योजना ही अर्धवट स्थितीत असून मुक्ताईनगर पशु महाविद्यालय या कामांना मंजुरी मिळण्याची देखील त्यांनी प्रसंगी केली. खान्देशासाठी कृषी विद्यापीठ करण्याबाबत मान्यतेसाठी प्रस्ताव पडून आहे त्याला मान्यता मिळावी तसेच वरणगाव पोलीस प्रशिक्षण केंद्र, एसआरपी ट्रेनिंग सेंटर जागा उपलब्ध असून तातडीने ते सुरू करण्यात यावे, हिंगोणा, ता.यावल येथे केळी संशोधन केंद्राला जागा उपलब्ध असून मंजुरी देखील मिळालेली आहे, पाल, ता. रावेर येथील फलोत्पादन हॉर्टिकल्चर कॉलेजला शंभर एकर जागा उपलब्ध करून दिली असून त्याला मान्यता मिळावी, कोथळी मुक्ताईनगर येथील एकात्मिक तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत शंभर कोटी पैकी प्रकल्पास आतापर्यंत 16 कोटी प्राप्त झालेले आहेत उर्वरित निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, तसेच नवीन क्रीडा संकुलासाठी एक लाख चौरस मीटर जागा ही नवीन मुक्ताई मंदिराच्या पादुकांच्या बाजूला उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यालादेखील तत्काळ कार्यान्वित करण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली. अ‍ॅड.रोहिणी खडसे व पदाधिकारी उपस्थित होते.