कामोठ्यात दाम्पत्यासह 15 वर्षीय मुलीची आत्महत्या

0

पनवेल : कामोठ्यात एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आजारपण व नैराश्यातून एका 14 वर्षीय मुलीसह एका दाम्पत्याने स्वतःची जीवनयात्रा संपवली. या घटनेनंतर कामोठ्यात एकच खळबळ उडाली आहे. या कुटुंबातील महिला डॉक्टर असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. कामोठे सेक्टर 36मधील इंद्राविहार इमारतीतील इ-विंगच्या रूम नंबर 503 मध्ये राहणार्‍या महिला डॉक्टर जस्मिन पटेल(45), त्यांचे पती इंद्रजित दत्ता (50) व त्यांची मुलगी ओसीन पटेल (15) या तिघांनी आपल्या राहत्या घरी आज दुपारी 1 च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

जस्मिन पटेल या पेशाने डॉक्टर असून त्या कामोठे येथील तिरुपती इमारतीत स्वतःचे क्लिनिक चालवत होत्या. मात्र स्वतः आजाराने ग्रासलेल्या असल्यामुळे त्यांना प्रचंड नैराश्य आले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच त्यांचे पती हे बर्‍याच वर्षांपासून घरीच असल्याने त्यांनादेखील आपल्या पत्नीच्या आजारपणाचा व स्वतः कुठेच कामाला नसल्याने तेही मानसिक तणावात होते व त्यामुळेच त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तसेच आपल्या पश्‍चात आपल्या 15 वर्षाच्या मुलीचा जगून काय उपयोग या तणावात त्यांनी तिलादेखील आत्महत्या करण्यास भाग पाडले, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर कामोठे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.