काम करणार्‍या 35 टक्के महिलांना दुसरे अपत्य नकोच; असोचेमचे सर्वेक्षण

0

नवी दिल्ली । देशातील शहरी भागात काम करणार्‍या (वर्किंग वुमन्स) सुमारे 35 टक्के महिलांना दुसरे अपत्य नको आहे. या महिलांनी दुसर्‍या अपत्यासाठी वेळ देता येत नसल्याचे कारण पुढे केल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. शहरी राहणीमानातील वाढता खर्च, मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून करावी लागणारी धडपड ; या बाबींना सध्याच्या काळातील सुशिक्षित माता महत्व देत असल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.

सामाजिक विभागाचा सर्व्हे
लग्नसंबंधातील ताणतणाव, कामाच्या ठिकाणचा वाढता तणाव, मुलांना वाढवण्यासाठीचा खर्च ही एक अपत्यावरच थांबण्यामागची प्रमुख कारणे असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. ‘मदर्स डे’ निमित्त देशभरातील महत्वाच्या 10 शहरातून 1500 महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातून हा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. असोचेमच्या सामाजिक विभागाने हा सर्व्हे केला. विभक्त कुटुंब पद्धतीने त्यांचा ताण नेहमी वाढलेला दिसतो.

सर्वच भागातील शहरांचा समावेश
अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोलकाता, लखनऊ आणि मुंबईतील महिलांना यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले होते. आपल्या मुलगा किंवा मुलीसाठी तुम्ही किती वेळ देता असा प्रश्‍नही महिलांना विचारण्यात आला होता. सरकारने एक मूल असलेल्यांना कर सवलत, भत्ते द्यावेत अशीही मागणी करण्यात आली आहे. अशा गोष्टींमुळे एक मूल संकल्पनेला प्रोत्साहन मिळू शकते, असे त्यांना वाटते

पदोन्नतीवर परिणामांची भिती
500 हून अधिक महिलांना दुसरे अपत्य मूल नको आहे. दुसर्‍या बाळंतपणासाठी घेतलेल्या रजेमुळे आपल्या पदोन्नतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही जोखीम घेऊ शकत नसल्याचे त्या म्हणतात. त्याचबरोबर काहींना एकाच मुलावर लक्ष केंद्रीत करता यावे म्हणून दुसरे मुल नको आहे. काहींना त्यांच्या जोडीदाराकडून दुसर्‍या मुलाबाबत योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुलांचे संगोपन व शिक्षण याबाबींचा सुशिक्षित आणि कमावते दाम्पत्य गांभीर्याने विचार करतात.