साक्री। तालुक्यातील म्हसदी नजीकच्या कांयकडा लघुप्रकल्पात शुन्य टक्के पाणीसाठा असतांना देखील शेतकर्यांना लाभार्थी दाखवून दुष्काळीपासून वंचीत ठेवल्याची तक्रार तेथील शेतकर्यांनी साक्रीचे तहसिलदार संदिप भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.सन 2015-16 या खरीप हंगामातील आणेवारी नुकतीच जाहीर झाली. त्यात म्हसदी गावाची पन्नास पैशांच्या आत आणेवारी दाखविण्यात आली. परिणामी म्हसदी गाव दुष्काळसदृश्य म्हणून जाहीर झालेले आहे. मात्र, कांयकडा लघुपाटबंधारा 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. त्यावेळी काकोर शिवार, मोरदश शिवार, डोहळ्या शिवार व हिंदळ्या शिवारातील जमिनी लाभदायक क्षेत्रात दाखवण्यात आल्या. परंतु, धरण बांधल्यापासून आजपर्यंत पाटचार्या नाहीत. या 40 वर्षांत या धरणात पाणी देखील आलेले नाही व पूर्ण क्षमतेने कधी साचले नाही.
प्रत्येक अहवालात शून्य टक्केपाणी दाखविले
धरण कोरडेठाक असतांना धरणातील पाण्याचा लाभ शेतकर्यांना दाखवला गेला आहे. अशी खोटी माहिती शासनाकडे पाठवली जाते. यामुळे या भागातील शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचीत राहत असल्याची तक्रार या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.दरवर्षी लघुपाटबंधारे विभागाकडून कायंकडा धरणातील पाण्याचा अहवाल पाठवला जातो. प्रत्येक अहवालात शून्य टक्केपाणी दाखवण्यात आले आहे. मग या शेतकर्यांना पाण्याचा लाभ मिळतो कसा. असे अहवाल दिशाभूल करणारे आहेत. यामुळे याभागातील कहींना दुष्काळ निधी मिळतो तर काहींना लाभही मिळत नाही. म्हणून कायंकडा लघुप्रकल्पाच्या लाभार्थ्यांच्या यादीतून शेतकर्यांना वगळण्यात यावे व दुष्काळी निधीचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी रमेश देवरे, दामोध देवरे, देवेंद्र देवरे, निंबा देवरे, रघुनाथ ह्याळीस, सुनिल देवरे, रघुनाथ भामरे, राकेश देवरे, लोटन देवरे, विजय देवरे, अमर पिंजारी, राजेंद्र देवरे आदी उपस्थित होते.