वरणगाव। येथील पोलीस स्टेशनचा पदभार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदिश परदेशी यांनी सांभाळल्यानंतर वेगवेगळे उपक्रम करुन नागरीक व पोलीस यांच्यातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. याअंतर्गत कागदोपत्री असलेले पोलीस मित्र संकल्पना राबविण्यासाठी तरुण व पोलीस पाटील यांची एकत्रीत बैठक घेवून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस अॅपची दिली माहिती
वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये 3 अधिकारी व 27 पोलीस कर्मचारी आहेत. यात ठाणे अंमलदार, बिनतारी संदेश यंत्रणा, गोपनिय विभाग, गुन्हेविभाग, कोर्ट विभाग यासह इतर दैनंदिन कामकाजासाठी पोलीस बळ जास्त लागते. यासाठी पोलीस यंत्रणेवर आतिरिक्त भार वाढला आहे. वरणगाव पोलीस चौकी अंतर्गत शहरासह 27 खेडे येतात. यामुळे पोलीस यंत्रणेवर अधिकचा भार वढला आहे. हा भार कमी करण्यासाठी परदेशी यांनी कागदोपत्री असलेली यंत्रणा प्रत्यक्षात कार्यवाहीत आणली. यासाठी या सर्व खेड्यातील पोलीस पाटील यांच्यासोबत पाच तरुणांची बैठक नुकतीच पोलीस स्टेशनमधे घेतली. या सर्वांना महाराष्ट्र पोलीस अँपची माहिती दिली. तसेच त्यांच्याकडून माहिती भरून घेतली.
अशा आहेत अटी
पोलीस मित्र होण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबधीत नसावा, पोलीस स्टेशनमध्ये कोणताही गुन्हा दाखल नसावा, अॅन्ड्रॉईड मोबाईल हाताळता आला पाहिजे अशा अटी मान्य असलेल्या प्रत्येक गावातील पाच तरुणांना संधी मिळणार आहे.
तत्काळ मदत पोहचणार
या अॅपवर घडलेल्या घटनेचे फोटो अथवा माहिती टाकायची यामुळे तात्काळ हि माहिती वरणगाव पोलिसांना मिळेल. पोलीस घटनास्थळी पोहचत नाही तोवर परिस्थीवर नियंत्रण ठेवायचे आहे. यामुळे पोलीस मदत लवकर पोहचेल. विशेष म्हणजे या अँपवरील माहिती जळगाव, नाशिक, मुंबई पर्यंत संलग्न आहे.
ग्रामरक्षक दलाची स्थापना
पोलीस मित्र योजनेप्रमाणे ग्रामरक्षक दलाची स्थापना वरणगाव पोलीस करणार आहे. यामुळे पोलीस व नागरिकांमध्ये समन्वय साधला जाणार आहे. यासाठी लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे. तसेच गोपनीय माहिती, चुकीचे घडणार्या घटनांची माहिती त्वरित पोलिसांना मिळेल.
नक्की फायदा होणार
शहरात अत्यल्प पोलीस कर्मचारी असल्यामुळे ग्रामीण भागातही बंदोबस्ताचा ताण कर्मचार्यांवर येतो. अशात काही आपत्कालीन घटना उद्भल्यास होणारी ताणाताण टाळण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे पोलीस पाटील व पोलीस मित्र हि संकल्पना खर्या अर्थाने वापरात आणल्यास याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघ यांनी सांगितले. यावेळी ठुबे, गोपनीय विभागाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल येवले, दत्तात्रय कुळकर्णी आदी उपस्थित होते.