विरोधी पक्षासह शिवसेनेचेकडूनही गृहखात्यावर टीकेचा भडीमार
मुंबई:- राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजबारा उडाला असल्याचा आरोप विरोधी पक्षांतील नेत्यांनी केला आहेच. त्यासोबतच सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी देखील कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढले. गुन्हेगारी वाढत चालली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालल्याचे सांगत सरकार यावर अंकुश आणण्यात कमी पडत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. विरोधी पक्षाच्या वतीने सोमवारी नियम २९३ अन्वये विधानसभेत प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर चर्चा करतांना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जंयत पाटील, शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढले.
न्यायमूर्ती लोयाची चौकशी का थांबवताय- पृथ्वीराज चव्हाण
सोहराबुद्दीन इनकाऊन्टर प्रकरणात न्यायाधीश म्हणून काम करणाऱ्या न्यायाधीश लोया यांच्या हत्येचा प्रकरणाची चौकशी होऊ नये यासाठी राज्य सरकार हरीष सावळे सारखे महागडे वकील लावत आहेत. चौकशी होऊ न देण्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि सरकारचा काय इंटरेस्ट आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. न्यायमुर्ती लोया यांच्या मृत्यूची चौकशी तसेच सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर काय भूमिका आहे याची माहिती सभागृहाला द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. राज्यातील कायदा व्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून लोकांचा कायद्यावर विश्वार राहिला आहे की नाही असे वातावरण तयार झाले असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर केला.
मुख्यमंत्र्याचे शहर आणि राज्याची उपराजधानी असुरक्षित – जयंत पाटील
राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्र्याचे शहर असलेले नागपूर हेच असुरक्षित शहर झाले आहे. नागपूर मध्ये सीसीटीव्ही लावण्याची घोषणा करून तीन वर्षे उलटले अजूनही सीसीटीव्ही बसले नाहीत. सीसीटीव्ही बसले असते तर आता ही वेळच आली नसती. नागपूरातील वाढत चाललेली गून्हेगारी ही राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती दर्शवीत आहेत. राज्यात भीमा- कोरेगाव सारखे प्रकरण घडतात. नाशिक जिल्ह्यातील जिवंत काडतूसे सापडत आहेत. शस्त्रसाठा सापडतोय. अहमदनगर मध्ये पार्सल बॉम्ब फुटतो. सुजाता पाटील यांच्या सारख्या वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यालाच पोलिसाकडून कोणती वागणूक मिळते ही सर्व प्रकरणे पाहिली असता राज्यातील महिलांची परिस्थिती काय आहे हे लक्षात येत असल्याचे सांगत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची अनेक उदाहरणे सांगितले. नागपूरमध्येच पोलिसांचे नियंत्रण राहिले नसल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.
आमदारांनाच गुंडाकडून धमकी – सुनिल प्रभू
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालेला आहे. यामध्ये मुंबईची तर अवस्था अतिशय वाईट झाली आहे. आमदाराला जीवे मारण्याची धमकी दिली जाते. गून्हेगारांची मजल किती वाढली आहे हे याठिकाणी दिसून येत असून पोलिसांनी मात्र अजूनपर्यंत या प्रकरणी दखल घेतली नसल्याचा आरोप करत सुनिल प्रभु यांनी राज्यातील कायदा व सूव्यवस्थेवरून गृहखात्याला लक्ष केले.