कायदा सुव्यवस्था बिघडविणार्‍या मंडळांवर गुन्हे दाखल करणार

0

प्रकाश गायकवाड : सार्वजनिक गणेशोत्सव सुखकर्ता पुरस्कार प्रदान सोहळा

हडपसर : उत्सव व सण परंपरा जपण्यासाठी असतात. सामाजिक एकोपा निर्माण होण्यासाठी उत्सव मदत करतात. मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामाजिक शांततेचे जतन करून उत्सवाचे पावित्र्य राखावे अन्यथा कायदा सुव्यवस्था बिघडविणार्‍या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा सूचना पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी केल्या आहेत.

हडपसर पोलीस स्टेशन व पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव सुखकर्ता पुरस्कार कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सहायक पोलीस आमदार योगेश टिळेकर, आयुक्त मिलिंद पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील तांबे, जगन्नाथ कळसकर, निलेश मगर, योगेश ससाणे, मारुती तुपे, पूजा कोद्रे, शशिकला वाघमारे, डॉ. शंतनू जगदाळे, कृष्णकांत कोबल, अनिल मोरे, जयप्रकाश वाघमारे, हमराज कुंभार याप्रसंगी उपस्थित होते.

भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्या

कायदा सुव्यवस्था, पावित्र्य राखावे, महिला, मुली उत्सवाचा आनंद घेऊ शकतात, असे भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सहायक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील यांनी केले. पोलीस, पत्रकार, लोकप्रतिनिधी व गणेश मंडळे यांच्यात समन्वय राखण्यासाठी अशा पुरस्कार कार्यक्रम व बैठकांचे आयोजन गरजेचे असल्याचे मत आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केले. बेटी बचावचा संदेश गणेशोत्सव व गौरी सजावटमध्ये केल्यास बक्षीस दिले जाईल, अशी माहिती माजी उपमहापौर निलेश मगर यांनी दिली.

अजंठा मित्र मंडळाने मारली बाजी

हडपसर परिसरातील गणेशोत्सव मंडळांना सुखकर्ता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम पुरस्कार अजंठा मित्र मंडळ, द्वितीय क्रमांक अखिल महादेवनगर युवा मंच, तृतीय क्रमांक युवा ग्रुप, उत्कृष्ट देखावा प्रथम क्रमांक विहार मित्र मंडळ, द्वितीय क्रमांक शिवराज मित्र मंडळ, तृतीय क्रमांक कामधेनू मित्र मंडळ यांना देण्यात आला. तसेच उत्कृष्ट गणपती विसर्जन मिरवणूक पुरस्कार श्रमिक मित्र मंडळ, श्री गणेश फेस्टिवल, पंडित जवाहरलाल नेहरू मित्र मंडळ यांना देण्यात आला. गणेशोत्सवामध्ये सहकार्य करणार्‍या स्मार्ट अकॅडमी, विजय मोरे, प्रदीप वर्मा, महिला पोलीस मित्र संघटना, अमानोरा सिक्युरिटी फोर्स, एस. एम. जोशी कॉलेज, एन. सी. सी व इतर सामाजिक संघटनांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनल गुरव तर आभार हेमराज कुंभार यांनी मानले.