इंदापूर । ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस पाटील हे पद महत्त्वाचे असून केवळ महसूल विभागच नव्हे तर शासनाच्या गाव पातळीवर कार्यरत असणार्या सर्व विभागांचा तो दुवा असल्याचे मत इंदापुरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले. इंदापूर तालुका पोलिस पाटील संघातर्फे पंचायत समिती अल्पबचत सभागृहात आयोजित पोलिस पाटील दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलिस निरीक्षक सजन हंकारे, तुकाराम सातव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पोलिस पाटलाने गाव पातळीवरील वाद विवाद, तंटे, बेकायदा उत्खनन, गौण खनिज चोरी, अवैध धंद्यांबाबत सविस्तर अहवाल तयार करून तो अहवाल तालुका दंडाधिकारी व पोलिस ठाण्याकडे वेळोवेळी जबाबदारीने सादर केला पाहिजे. समाज विघातक घटकावर लक्ष ठेवून त्याची माहिती प्रशासनाला द्यावी. गाव पातळीवर कार्यरत शासनाच्या विविध कर्मचार्यांशी दैनदिन संपर्क ठेवणे गरजेचे आहे. गरजूंना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा व राजकारणापासून अलिप्त राहून नि:पक्षपातीपणाने माहीती शासनाला पुरविण्याचे आवाहन श्रीकांत पाटील यांनी केले.
17 डिसेंबर 1967 रोजी महाराष्ट्राचे तात्कालीन राज्यपालांनी ग्राम पोलिस अधिनियम कार्यान्वित केला. त्यास 17 डिसेंबर 2017 रोजी 50 वर्षे पुर्ण झाली. त्याचे औचित्य साधून इंदापूर तालुका पोलिस पाटील संघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहीती प्रदिप पोळ यांनी दिली. तुषार झेंडे, अजीत पाटील, तनुजा कुताळ यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरूण कांबळे यांनी केले तर आभार सुनिल राऊत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजयकुमार करे, अनिलराव भांगे, बाळासाहेब कडाळे, विलास कणसे, संजय झगडे, परमेश्वर ढोले यांनी विशेष परिश्रम घेतले.