धुळे । जिल्ह्यातील विविध संघटनांतर्फे 31 जुलै रोजी लळिंग कुरण येथे भीमस्मृती यात्रा, मेळावा व इतर संभाव्य कार्यक्रमांचे पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांनी कायदेशीर तरतुदींचे पालन करुनच या परिसरात भेट द्यावी, असे आवाहन धुळे वनविभाग उपवनसंरक्षक जी. के. अनारसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. उपवनसंरक्षक श्री. अनारसे यांनी म्हटले आहे, धुळे वन परिक्षेत्र हद्दीतील लळिंग कुरण, लांडोर बंगला राखीव वनक्षेत्र परिसरात 31 जुलैला भारतीय वनअधिनियम 1972 चे कलम 26 नुसार वनात मनाई असणार्या कृत्यांना प्रतिबंधित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध संघटनांतर्फे 31 जुलै रोजी लळिंग येथे भीमस्मृती यात्रा, मेळावा व इतर संभाव्य कार्यक्रमांचे पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांनी कायदेशीर तरतुदींचे पालन करुनच या परिसरात भेट द्यावी. राखीव वनक्षेत्रात आग पेटविणे, स्टॉल लावणे आदींना प्रतिबंध करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी येणार्या सर्व व्यक्तींनी नियमांचे पालन करुन या क्षेत्रास 31 जुलै रोजी भेट देण्यास व सर्व उपस्थितांनी एकमेकास सदभावना व्यक्त करण्यास हरकत नाही, असेही श्री.अनारसे यांनी कळविले आहे.