कायद्याचे राज्य येवो!

0

पंधरा सप्टेंबर 2015… महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना या दिवशी घडली होती. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे सपत्निक मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी हा भ्याड हल्ला केल्याचा संशय तेव्हा व्यक्त करण्यात आला होता. या हल्ल्यात पानसरे सरांच्या पत्नी कॉ. उमा पानसरे गंभीर जखमी झाल्या होत्या तर, कॉ. पानसरे यांच्या डोक्यात गोळी घुसली होती. सतत पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मुंबईत उपचारादरम्यान या झुंजारनेत्याने आपला देह ठेवला होता… या भ्याड हल्ल्याची पार्श्‍वभूमी एवढ्यासाठीच की, कॉ. पानसरे यांच्या खूनाचा संशयित आरोपी सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक समीर गायकवाड याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एल. डी. बिले यांनी 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि काही सक्तीच्या अटी घालून हा जामीन मंजूर केला आहे. कागदपत्रांची पूर्तता वेळेवर न झाल्यामुळे समीरची आज (सोमवारी) तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे.

15 सप्टेंबरला कॉ. पानसरे आणि त्यांच्या पत्नी कॉ. उमा पानसरे यांच्यावर हल्ला झाला होता आणि समीर गायकवाडला विशेष तपास पथकाने (एसआयटी) 16 सप्टेंबर 2015 रोजी अटक केली होती. या अटकेनंतर कॉ. पानसरे हत्येप्रकरणात फार काही विशेष घडामोडी झाल्या नाहीत. याबाबत कॉ. मेघा पानसरे यांनी वारंवार प्रसार माध्यमांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. परवा समीर गायकवाडला जामीन मंजूर झाल्यानंतरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापेक्षा अजून काही करण्यासारखे त्यांच्या हातात नाहीय…

महाराष्ट्रातील दोन ज्येष्ठ पुरोगामी विचारांच्या नेत्यांची हत्या झाली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे या दोन पुरोगामी नेत्यांना आपल्या विचारांमुळे प्राणास मुकावे लागले आहे. तर कर्नाटकात प्रा. एम. एम. कलबुर्गी यांनाही आपल्या विचारांमुळेच प्राणाचे बलिदान द्यावे लागले आहे. या तीन पुरोगामी विचारांच्या माणसांच्या हत्यांचा आरोप उजव्या विचारसरणीच्या कट्टरतावादी संघटनांवर आहे. सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती या दोन्ही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांवर डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच पुरोगामी विचारांच्या संघटना या तिघांच्याही हत्येप्रकरणात रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करत आहेत. अशा परिस्थितीत समीर गायकवाड याला जामीन मंजूर करणं म्हणजे या कार्यकर्त्यांच्या न्यायाच्या मागणीला वाटण्याच्या अक्षता दाखवण्यासारखंच आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.

महाराष्ट्र, कर्नाटक या शेजारील राज्यांमधील पुरोगामी विचारांच्या माणसांची कट्टरतावादी संघटनांनी हत्या करणं, हे जणू आता नित्याचंच झाले आहे. याचे कारण देशभरातीलच पुरोगामी, सुधारणावादी विचारांच्या माणसांच्या हत्या करण्याचे सत्र सुरू झाले आहे. 16 मार्च 2017 या दिवशी कोइम्बतूरमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या हत्येचे पडसाद कोइम्बतूरमध्येही नीटसे उमटले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये या हत्येबाबत हळहळ व्यक्त का केली गेली नाही, असा प्रश्‍नच चुकीचे आहे. पण आता हा प्रश्‍न विचारावाच लागेल. आधुनिक विचारांच्या जोरावर समाजातील असंविधानिक गोष्टींवर बोलण्याची सजा जर थेट खून हीच असेल, तर मात्र या देशात न्यायाचे राज्य नाही, हेच खरे आहे.

फारूक हमीद नावाच्या एका 31 वर्षीय तरुणाची तामीळनाडू राज्यातील कोइम्बतूर येथे हत्या करण्यात आली आहे. ही हत्या कट्टरतावादी मुस्लीम संघटनांकडून केली गेली असल्याचा संशय व्यक्त होतो आहे. फारूकच्या हत्येबाबत त्याचे वडील हमीद यांनी प्रसार माध्यमांना दिलेली माहिती न्यायाच्या लढ्याला बळ देणारी आहे. हमीद यांनी सांगितले की, माझा मुलगा, माझा मित्र होता. तो कधीच आमच्या जवळच्या नातेवाईकांच्याही लग्नाला तो येत नसे. कारण त्याला लग्नसमारंभातील धार्मिक विधी मान्य नव्हत्या. मीही फारूकला कधीच धर्माच्या आचरणाची सक्ती केली नाही. तो अतिशय मोकळ्या विचारांचा होता. त्याने कदावूल इलाही, कदावूल इलाही, कदावूल इलाही (देव नाही, देव नाही, देव नाही) असं लिहिण्यामुळे त्याची हत्या करण्यात आली आहे. मला खरोखरंच असं वाटतं की, या कारणामुळेच जर माझ्या मुलाची हत्या करण्यात आली असेल तर, माझा मुलगा ज्या विचारांचं काम करत होता ते योग्यच होतं. आणि हो, माझ्या मुलाचे जे कोणी मारेकरी आहेत, ते जर खरोखरंच मुस्लीम असतील तर, मात्र त्या मारेकरांनी पवित्र कुराणचा नीट अभ्यासच केलेला नाही. पवित्र कुराणाची शिकवण समजून घेण्यात त्यांची गफलत होते. ते काहीही असो… पण मला आता असे ठामपणे वाटते आहे की, माझा मुलगा ज्या संघटनेचे काम करत होता ती संघटनेचा आता मीही सदस्य व्हायला हवं. आणि त्याचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायला हवेत.

जागतिक पितृदिन साजरा होत असतानाच फारूकचे वडील हमीद यांची ही व्यथा मांडताना अनेक प्रश्‍न नव्याने उभे राहिले आहेत. या देशात कधी तरी न्यायाचे, कायद्याचे राज्य येणार आहे का? की दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांच्यानंतर फारूक सारख्या तरुणांनाही आपल्या जीवाला मुकावं लागणार आहे? आधुनिक विचारांचे असणे, सुधारणावादी विचारांचे असणे, पुरोगामी विचारांचे असणे, हा गुन्हा आहे का? कट्टरतावाद्यांना या देशाची कायदेव्यवस्था आळा घालणार आहे का? असे अनेक प्रश्‍न फारूकच्या हत्येमुळे आणि समीर गायकवाडला जामीन मंजूर झाल्यामुळे उभे राहिले आहेत.

– राकेश शिर्के