कायमस्वरुपी उपाययोजना केल्यास नाही बसणार टंचाईची झळ

0

आमदार संजय सावकारे ; भुसावळात टंचाई आढावा बैठक

भुसावळ- दरवर्षी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईमुळे तात्पुरत्या उपाययोजना राबवल्या जातात मात्र यावर होणारा खर्च पाहता कायमस्वरुपी उपाययोजना केल्यास पाणीटंचाईवर मात करता येईल, असा आशावाद आमदार संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केला. पाणी बचत ही काळाजी गरज असून प्रत्येकाने पाण्याचे महत्व ओळखावे, असे आवाहन त्यांनी पंचायत समितीच्या टंचाई आढावा बैठकीत मंगळवारी केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती प्रीती पाटील, पंचायत समितीच्या सदस्या मनिषा पाटील, सरला कोळी, जिल्हा परीष सदस्य रवींद्र पाटील, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पाणीपुरवठा अभियंता एस.पी.लोखंडे, कार्यालयीन अधिक्षक राजेंद्र फेगडे आदि उपस्थित होते.

पाणीपुरवठ्याबाबत असंख्य तक्रारी
आढावा बैठकीत सरपंच व ग्रामसेवकांनी पाणी टंचाईच्या विविध समस्या आमदार संजय सावकारे यांचे समोर मांडल्या. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये विजेचा पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे गावकर्‍यांना वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याचे तसेच अनेक गावांमध्ये पाणी योजनांचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याचे तक्रारी झाल्या, तालुक्यातील अंजसोंडा, आचेगाव, वेल्हाळे, फुलगाव, जारगाव, काहुरखेडा, कुर्‍हे, खंडाळा, मन्यारखेडा, पिंपरी सिकम, सुनसगाव, वांजोळा, पिपंळगाव खुर्द गावातील सरपंच व ग्रामसेवकांनी गावातील पाणीपुरवठ्याच्या समस्या मांडल्या.