काय आहे सारी आजार ?

0

जगभर कोविड १९ अर्थात कोरोना विषाणूचे थैमान असतांनाच सारी आजाराने आपले डोके वर काढले आहे.विशेषतः मराठवाडा,खान्देश परिसरात सारी आजाराने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे जनसामान्यांमध्ये कोरोना सोबतच सारी आजाराची देखील भीती आहे. नेमका काय आहे सारी आजार ते आपण समजून घेऊ या. सारी म्हणजे सिव्हीयर ऍक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन (S.A.R.I.).सारी आजार हा वेगवेगळ्या जिवाणू (बॅक्टेरिया) किंवा विषाणू (व्हायरस) संक्रमणामुळे होतो. हा जुनाच आजार आहे. यात प्रामुख्याने श्वसनसंस्था बाधित होते.सारी ने ग्रस्त असलेल्या रुग्णाला धाप लागते. श्वासोश्वासाची गती नेहमीपेक्षा जास्त असते. लहान मुले, वयोवृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये सारी चे प्रमाण अधिक असते.

सारी आजाराचे मुख्य लक्षणे म्हणजे सर्दी ,खोकला ,ताप,श्वास घेणेस त्रास होणे ,धाप लागणे,कमी दिवसात रुग्ण अत्यव्यस्त होणे. सारी आजारात वेगवेगळ्या जिवाणू किंवा विषाणूंमुळे श्वसनसंस्थेत गुंतागुंत निर्माण होते आणि कमी वेळात रुग्ण अत्यवस्थ होतो. सध्या सारीच्या रुग्णाची कोविड १९ ही तपासणी देखील केली जात आहे. सारीच्या आजाराचे, कोरोना विषाणू हे देखील एक कारण असू शकते. कोविड १९(कोरोना) आणि सारी आजारात खालील प्रमाणे साम्यता आहे.
-दोन्ही आजार श्वसनसंस्थेशी निगडीत असतात.
– दोन्ही आजारात श्वास घेण्यास त्रास होत असतो.
-दोन्ही आजारांमध्ये तापाचे प्रमाण अधिक असते.

कोव्हीड १९ आणि सारी आजारातील फरक-
-कोविड १९ हा संसर्गजन्य आजार आहे.एका व्यक्तीकडून अनेक व्यक्तींमध्ये हा आजार पसरतो,तर सारी संसर्गजन्य असेलच असे नाही.
-कोविड १९ हा Sars-CoV-2 या विषाणूंच्या संसर्गामुळे होतो तर बॅक्टेरियल इन्फेकशन, कोरोना संसर्ग किंवा न्यूमोनिया अशा कोणत्याही आजारामुळे फुफ्फुसांची क्षमता कमी होणे म्हणजे सारी.
-सारी हा जुनाच विविध जीवाणू ,विषाणूंमुळे असलेला श्वसन संस्थेचा आजार आहे. तर कोविड १९ चा उद्रेक हा गेल्या वर्षी चीन मधील वुहान शहरात झाला.

सारी आजार ५ वर्षाखालील मुले आणि ६० वर्षा वरील व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.सारीचे निदान हे एकूण आजाराची लक्षणे,छातीचा एक्स-रे तसेच रक्ताच्या चाचणीद्वारे करण्यात येते. जिवाणूंमुळे झालेल्या सारीच्या आजारावर योग्य ते
अँटीबायोटीक देऊन यशस्वी उपचार होतात.तर विषाणूंमुळे झालेल्या सारी च्या लक्षणानुसार उपचार सुरू ठेवावे लागतात,यात जुनाच असलेला स्वाइन फ्लू वर योग्य ती औषधे उपलब्ध आहेत.प्रसंगी कृत्रिम श्वास देण्याची गरज पडू शकते.वेळीच पहिल्या टप्प्यात दुर्लक्ष न करता उपचार सुरू केल्यास आपण सारी आजारावर मात करू शकतो.

श्वसन संस्थेशी निगडित कोणत्याही लक्षणाला हलक्यात घेऊ नका.तात्काळ नजीकच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. उपचार करण्यास उशीर झाला तर रुग्ण अत्यवस्थ होऊ शकतो आणि प्रसंगी प्राण देखील गमवावे लागू शकतात. सारी किंवा कोरोना पासून बचाव करण्यासाठी सध्या लॉक डाऊन असल्याने घरातच थांबा,बाहेर पडू नका. परंतु वैद्यकीय, कर्मचारी , पत्रकार, पोलीस यांना कामानिमित्त बाहेर पडावेच लागते.त्यामुळे बाहेर पडतांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.लहान मुले आणि वयोवृद्ध गटातील रुग्ण या आजाराने ग्रस्त होण्याचे प्रमाण अधिक असल्याने या गटातील व्यक्तींची जास्त काळजी घ्या. सकस आहार घेत प्रतिकार शक्ती वाढवा आणि सारी आजाराला आपल्या पासून दूर सारा.

डॉ.धर्मेंद्र पाटील,
नेत्ररोगतज्ञ,
जळगाव.