काय खरे, काय खोटे?

0

अलीकडच्या काळात लोकप्रतिनिधींना इन्स्टंट प्रसिद्धीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यात मुद्रित माध्यमातील बातम्या पेरण्याच्या हुकमी मार्गासोबत आधुनिक युगाची साधनेही आता त्यांना उपलब्ध झाली आहेत. यात इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियासारख्या परिणामकारक साधनांचा समावेश आहे. याचा सर्वात उत्तम नमुना म्हणजे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाची लोकप्रतिनिधींची कृत्ये आठवून पाहा. सभागृहात अभ्यासपूर्ण वक्तव्य करण्यापेक्षा गोंधळ घालणे अथवा सभागृहाबाहेर वृत्तवाहिन्यांच्या कॅमेर्‍यासमोर बोलण्याने मिळणारी प्रसिद्धी सहजसोपी असल्याने अनेक मान्यवर याचा उपयोग करत असतात. याच पद्धतीने वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून गौप्यस्फोटांचा नवीन पॅटर्नदेखील राज्याच्या राजकारणात उदयास आला आहे. हे सर्व नव्याने सांगण्यासाठी निमित्त ठरले ते आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या गौप्यस्फोटाचे! खरं तर सध्या राज्य सरकार स्थिर असून, तोडफोड करण्यासारखी कोणतीही स्थिती नाहीय. असे असूनही त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला भाजपमध्ये येण्यासाठी पाच कोटी रुपयांची ऑफर दिल्याचे सांगून एकच खळबळ उडवून दिली आहे.

चंद्रकांत पाटील हे सध्या राज्याच्या मंत्रिमंडळातील दुसर्‍या क्रमांकाचे नेते मानले जातात. हर्षवर्धन जाधव हे मराठवाड्याच्या राजकारणातील मातब्बर समजल्या जाणार्‍या स्व. रायभान जाधव यांचे सुपुत्र आहेत, तर त्यांचे सासरे रावसाहेब दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच माजी केंद्रीय मंत्री आहेत. मुळातच कोणतीही निवडणूक आता आर्थिकदृष्ट्या प्रचंड महागडी झाल्याची बाब उघड असताना आमदारकीच्या राजीनाम्यासाठी पाच कोटींची ऑफर दिल्याची बाबही या घटनाक्रमावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारी आहे. अलीकडेच मुंबई महापालिकेतील मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत केलेला प्रवेशदेखील यातील अर्थकारणाच्या चर्चेने चांगलांच रंगला होता. मनसे नेत्यांनी तर या प्रकरणात प्रत्येक नगरसेवकाला पाच कोटी रुपये देण्यात आल्याचा जाहीर आरोप केला होता. अर्थात एकीकडे नगरसेवकांना पाच कोटींचा कथित भाव असताना दुसरीकडे आमदारकीसाठीही याच आकड्यांची होणारी चर्चा वास्तवावर आधारित नक्कीच नसल्याची बाब उघड आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा खुद्द हर्षवर्धन जाधव यांनीच कॅमेर्‍यासमोर सांगितला आहे. कन्नड मतदारसंघातील रस्त्यांची दुर्दशा झाली असल्यामुळे आपण सातत्याने ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. इथेच या प्रकरणातील मेख असू शकते. मुळातच शिवसेना हा पक्ष केंद्र वा राज्यातील सत्तेत सहभागी असला, तरी त्यांना पूर्णपणे सत्ता उपभोगता येत नसल्याची बाब कुणापासून लपून राहिलेली नाही. अगदी शिवसेनेच्या मंत्र्यांनाही पूर्णपणे काम करू दिले जात नसल्याची ओरड आहे, तर याच पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांचीही कुचंबणा होत असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात येत आहेत. बर्‍याच आमदारांनी जाहीर व्यासपीठावरून या व्यथेला मांडलेदेखील आहे. या पार्श्‍वभूमीवर, एखाद्या शिवसेना आमदाराची खदखद या प्रकारे बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात या माध्यमातून का होईना आपल्या मतदारसंघाला न्याय मिळू शकेल, असे आमदार हर्षवर्धन जाधव यांचे गणित असू शकते. मात्र, यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हर्षवर्धन जाधव यांच्या पूर्व इतिहासाचा होय.

हर्षवर्धन जाधव हे 2009 साली मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते, तर 2014 मध्ये ते शिवसेनेच्या तिकिटावर आमदार बनले आहेत. 2011 साली त्यांचा पोलिसांसोबतचा वाद चांगलाच गाजला होता. यातून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षादेखील सुनावली आहे. अर्थात सध्या ते जामिनावर आहेत. यानंतर त्यांनी प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे वळवण्यासाठी अनेक उचापती केल्याचेही दिसून आले आहे. अलीकडेच त्यांनी थेट आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवून खळबळ उडवून दिली होती. या पार्श्‍वभूमीवर, अवघ्या दोन वर्षांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीआधी मतदारसंघातील कामांचा कळवळा दर्शवण्यासाठी तर त्यांनी हे नाट्य रंगवले नाही ना? हा प्रश्‍न साहजिकच उपस्थित होत आहे. मुळातच स्थानिक पातळीवर जाधव यांना शिवसेनेतूनच बर्‍याच प्रमाणात विरोध आहे. विशेष करून खासदार चंद्रकांत खैरे आणि त्यांच्याच मध्यंतरी विस्तवदेखील जात नसल्याची स्थिती होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडच्या दौर्‍यात यावर या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला असला, तरी ही गटबाजी पूर्णपणे नष्ट झाली असे म्हणता येणार नाही. यामुळे त्यांच्या या नाट्याला शिवसेनेतील अंतर्गत कलहाची पार्श्‍वभूमी आहे का हे तपासून पाहण्याचीदेखील आवश्यकता आहे. अर्थात या सर्व शक्यतांच्या पलीकडे जात ना. चंद्रकांत पाटील यांनी खरोखरीच हर्षवर्धन जाधव यांना ‘ऑफर’ दिली असल्यास हा प्रकार अतिशय गंभीर असाच मानावा लागेल. वर नमूद केल्यानुसार मुंबईतील मनसे नगरसेवकांच्या पक्षांतरामागे अर्थकारण असल्याची चर्चा रंगली होती. याचसोबत भाजपने गुजरातमधील पाटीदार समाजाच्या काही मान्यवरांना आपल्या पक्षात येण्यासाठी आमिष दाखवल्याचा आरोपदेखील अलीकडे करण्यात आला आहे. पाटीदार समाजाच्या नेत्यांनी तर भाजपने अ‍ॅडव्हान्स म्हणून दिलेल्या नोटांची बंडलेच प्रसारमाध्यमांसमोर सादर केली आहेत. या पार्श्‍वभूमीवर, हर्षवर्धन जाधव यांना आमिष दिले गेले असेल, तर याची चौकशी होऊन सत्य समोर येण्याची गरज आहे. सत्ता ही फक्त मलिदा लाटण्यासाठीच असल्याचा समज रूढ झाला असल्यामुळे पदांवर वा सत्तेवर चिपकून राहण्यासाठी अमाप पैसा ओतण्यात येत असल्याचे आधीही अनेकदा अधोरेखित झाले आहे. हर्षवर्धन जाधव यांचे कथित ऑफर प्रकरणही यातील असल्याचे दिसून येत आहे. यातील सत्यता समोर येण्याची आवश्यकता आहे. अन्यथा काही दिवस चर्वण झाल्यानंतर हे प्रकरण विस्मरणात जाईल, हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही.