वारसा सांगणारे त्यांचा घात का अपघात याचा जाब का विचारत नाहीत ? –
कर्जत- साडे चार वर्षे झाली, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या निधनाला. सरकारच्या वतीने औरंगाबाद मध्ये त्यांचे स्मारक उभारण्यात येणार होते , काय झाले त्या स्मारकाचे ? असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या तिसऱ्या टप्यातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील आजच्या सभेत ते बोलत होते. सभेला या भागातील ऊसतोड मजुरांची मोठी संख्या होती त्यांच्या भावना लक्षात घेत धनंजय मुंडे यांनी ऊसतोड मजुरांच्या महामंडळाचा विषय उपस्थित केला.
स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने ऊस मजुरांचे महामंडळ काढण्याचे सरकारने योजले होते, तेही त्यांनीच रद्द केले. औरंगाबाद येथे मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी जागा देणार होते. कुठे आहे जागा? कुठे आहे स्मारक? नुसत्या हवेत गप्पा. हा मुंडे साहेबांचा अपमान आहे असे ते म्हणाले.
अमेरिकेच्या हँकरने ईव्हीएमसाठी स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांची हत्या झाल्याचा दावा केला. मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या एकाही व्यक्तीने सत्तेला लाथ मारत या घातपाताच्या दाव्याची चौकशी करण्यास सांगितले नाही. आम्ही मात्र हा घात आहे की अपघात ते सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा दिला.
देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर गेल्या ४५ वर्षांतील सर्वाधिक. हा दावा मी नाही राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयच करतंय. मोदीजी तुमच्या नोटबंदीनं काय साध्य केलं? देशातील तरूणांना रोजगार देणं तर सोडाच, ज्यांच्याकडे रोजगार होता त्यांच्या पोटावरसुद्धा तुम्ही पाय दिला म्हणत बेरोजगारांच्या प्रश्नाला हात घातला.
सरकारने शेतकऱ्यांना तूर लावण्यास सांगूनही तूरीला भाव दिला नाही. सुभाष देशमुख यांनी तूर डाळीत केलेला भ्रष्टाचार आम्ही उघड केला. त्याची साधी चौकशी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली नाही. या घोटाळ्यामुळेच शेतकऱ्यांना तूरीसाठी योग्य भाव मिळाला नसल्याचा दावा मुंडे यांनी केला.
तीन लाख रुपयांच्या कर्जबाजारीपणामुळे व दुष्काळी परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्येतून नगर जिल्ह्यातील शिऊर येथे एका शेतकऱ्यांने आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी नांदेड येथे शेतकऱ्याने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केली. पाषाण ह्रदयी सरकारला पाझर फुटत नसेल तर मग हे सरकार हवे कशाला? म्हणत परिवर्तन करण्याचे आवाहन केले.
या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील,माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, युवा नेते रोहित पवार,नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके-पाटील, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंडपाटील आदींसह कर्जत, जामखेड येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.