‘काय होतास तू काय झालास तू!’; राज ठाकरेंवर भाजपची जहरी टीका

0

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. राज ठाकरे यांनी भाजपा-शिवसेना युतीचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळेच ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी राज ठाकरे सहा ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत असे बोलले जात आहे. यावरून भाजपाने राज ठाकरेंवर एका व्यंगचित्राच्याद्वारे जहरी टीका केली आहे. ‘कार्यकर्त्यांना एवढेही गृहीत धरू नये!’ असा खोचक सल्ला व्यंगचित्रातून देण्यात आला आहे.

भाजपा महाराष्ट्रच्या ट्विटर अकाऊण्टवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये राज यांची २०१४ मधील आणि आताची भूमिका असणारे व्यंगचित्र पोस्ट केले आहे. या चित्राला ‘काय होतास तू काय झालास तू!’, अशी कॅप्शन देण्यात आली असून ‘कार्यकर्त्यांना एवढेही गृहीत धरू नये!’ असा सल्ला राज यांना महाराष्ट्र भाजपाने दिला आहे. या व्यंगचित्रामध्ये पहिल्या भागात २०१४ मध्ये मनसेचे निवडणूक चिन्ह असणाऱ्या रेल्वे इंजिनवर बसून ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला पाडण्यासाठी साथ द्या’ असं म्हणत कार्यकर्त्यांनी भरलेला रेल्वेचा डबा घेऊन जाताना दिसत आहेत. तर दुसऱ्या भागात याच इंजिनावर बसलेले राज ठाकरे ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ द्या’ म्हणत २०१९ च्या निवडणुकांकडे जाताना दाखवले आहेत. या चित्रात इंजिनाच्या मागील डब्यात बसलेले कार्यकर्त्यांच्या तोंडी, ‘आपल्याला हे काय मुर्ख समजतात का?’, ‘कोणीतरी साहेबांना थोडी अक्कल द्या रे’ असे संवाद दाखवण्यात आले आहेत. दुसऱ्या चित्रामध्ये इंजिनला कार्यकर्त्यांच्या डब्ब्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झेंडा असलेला डब्बाही जोडल्याचे दाखवले आहे.