कारखानदारी वाढल्याने शिरूर एमआयडीसीला गुन्हेगारीचा विळखा!

0

शिक्रापूर (मंदार तकटे)। शिक्रापूर, सणसवाडीमधील कारखानदारी वाढल्याने लगतच्या तालुक्यातील राजकारण्यांनी व गुंडांनी या भागात शिरकाव केला आहे. त्यामुळे शिक्रापूर, सणसवाडीमध्ये आधीपासून अस्तित्वात असलेले, बडे राजकीय वरदहस्त लाभलेले ठेकेदार, नव्याने या क्षेत्रात येत असलेले स्थानिक ठेकेदार आणि येथे बस्तान बसविण्यासाठी बाहेरून येत असलेले मोठ्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे ठेकेदार यांच्यात भंगार माल, कामगार, माथाडी या ठेक्यातून वादविवाद होत आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधील शांतता, सुव्यवस्था, भंग होत चालली आहे.

गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या ठेकेदारांना पसंती
शिक्रापूर रांजणगाव एमआयडीसीमध्ये राजकीय पक्षाचा आधार घेत अथवा पक्षाचे पदाधिकारी असल्याची शेखी मिरवत व नेत्यांचा वरदहस्त असल्याचे सांगून कारखान्यात प्रवेश मिळवत कमिशन, ठेकेदारी मिळवणे व सांभाळणे हाच आपल्या राजकीय भवितव्याचा मार्ग निवडल्याने सर्वसामान्य बेरोजगार भूमिपुत्रांच्या व मूलभूत प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत आहे. हेच ठेकेदार स्थानिक कामगारांना धमकविण्यासाठी अग्रणी असतात. अनेक कारखानदारही कामगार संघटना दडपण्यासाठी गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या ठेकेदारांना पसंती देत आहेत.

लागेबांधे येतात आड
स्थानिकांनी आपल्या समस्यांबाबत न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बेरोजगारांचे आणि कामगारांचे प्रश्‍न सोडवण्यात कुठल्याच राजकीय पक्षांना स्वारस्य नाही. ग्रामपंचायीतीचे काही सरपंच, सदस्य, राजकीय पदाधिकारी, तालुक्यासह लगतच्या तालुक्यांचे आजी माजी लोकप्रतिनिधी व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे कारखानदारवर्गाशी लागेबांधे असल्याचे दिसून येते. विविध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक हितसंबंध असल्याने स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी आवाज कोण उठवणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.