भिवंडी । भिवंडी शहर आणि परिसरात कापड निर्मिती हा प्रमुख व्यवसाय आहे. कापड निर्मिती व्यवसाय करणारे व्यापारी जितेंद्र चौधरी यांना त्यांच्या कारखान्यात नवीन विजेचे कनेक्शन घ्यायचे होते. व्यापारी वेळेअभावी आपली सर्व कामे दलालांमार्फत करून घेतात. त्यानुसार रहेमान अमीन मोमीन या दलालाबरोबर नवीन विजेचे मीटर लावून देण्याची चर्चा झाली. त्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, घरपट्टी, फोटो वगैरेंची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. व्यापार्याने सुद्धा मोठ्या विश्वासाने दलालाने मागितलेली सर्व कागदपत्रे दिली.
दलाल रहेमान मोमीन याने विजेच्या मीटरऐवजी त्यांच्या मालकीचा नवीवस्ती येथील कापड निर्मिती कारखाना बनावटी कुलमुखत्यातपत्र तयार करून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू केला. जितेंद्र चौधरी यांना दलालाने आपल्या कागदपत्रांचा दुरूपयोग करून कारखाना विक्री करत असल्याचे समजताच त्यांनी तात्काळ भिवंडी शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. त्यानुसार अधिकार्यांनी तपास करून रहेमान मोमीन याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता कुलमुखत्यारपत्र नोटराईज करणेसाठी शेखर बोनीला यांचे सहकार्य घेतल्याचे सांगितले.