उल्हासनगर । सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करताना उल्हासनगरमधील जीन्स वॉश कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे, तर दुसरीकडे महापालिका प्रशासनानेही या कारखान्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केल्याने कारखानदार मालकांचे धाबे दणाणले आहेत. उल्हासनगरातील जीन्स वॉश कारखान्यांमुळे वालधुनी नदी प्रदूषित होत असल्याचा ठपका ठेवून या कारखान्यांची वीज, पाणी खंडित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
या संदर्भात 21 नोव्हेंबर रोजी पालिका, विद्युत मंडळ, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची जीन्स वॉश कारखानदारांसोबत बैठक आयोजित केली होती. त्यात पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयाच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन कारखानदारांना केले होते.
कारखानदारांना वाचवण्यासाठीही प्रयत्न सुरू
न्यायालयाच्या आदेशाचा आदर करताना जीन्स वॉश कारखानदारांनी त्यांचे कारखाने शुक्रवार पासून बंद केलेले आहेत. दरम्यान, उल्हासनगर कॅम्प नंबर 5 च्या परिसरात बहुतांश जीन्स वॉश कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम कार्यकारी अभियंता अशोक सावंत यांच्या मार्गदशर्नाखाली सुरू करण्यात आली आहे. कॅम्प 5 परिसरातील जवळपास 35 हून अधिक जीन्स वॉश कारखान्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता अशोक सावंत यांनी दिली तसेच या कारखानदारांना वाचवण्यासाठीही शहरात प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.