शिरपूर । शेतकरी सहकारी साखर कारखान्या संदर्भात शेतकरी विकास फाऊंडेशच्या वतीने 16 ऑगस्ट रोजी साखर कारखाना सुरु व्हावा यासंदर्भात निवेदन दिले होते. यात शिसाकाच्या संचालक मंडळाच्या वतीने आतापर्यत काय कार्यवाही केली याची माहिती अधिकृतरित्या जाहिर करण्याची मागणी केली होती. मात्र शिसाकाकडून आलेले पत्रक म्हणजे न केलेल्या कामाचे कौतुक करीत स्वत:च स्वत:च्या पाठीवर थाप मारुन घेतल्यासारखा प्रकार झाला आहे. कर्जाचे आकडे टाकून कारखाना सुरुच होणार नाही असे सूचवुन शेतकर्यांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोप करीत याबाबत समर्पक उत्तरे द्यावी अशा आशयाचे निवेदन शिरपूर येथील शेतकरी विकास फाऊंडेशनच्या वतीने शिसाकाच्या चेअरमन यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर फाऊंडेशनच्या सदस्यांसह अनेक शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
कर्जाची होती जाणिव
यापूर्वी सन 2003 साली कारखाना त्यांच्या ताब्यात दिला त्यानंतर भुपेश पटेल अध्यक्ष झाले. परंतु त्यांनी 56 कोटी कर्ज आणि कामगार कपातीचा मुद्दा पुढे करुन संपूर्ण संचालक मंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर कारखान्यावर कर्जाचा डोंगर असल्याने माहित असतांनाही निवडणुकीत कारखाना सुरु करण्याचे आश्वासन दिले. आता शेतकर्यांना कर्जाची भीती दाखविली जात आहे. या निवेदनावर शेतकरी विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष ठाणसिंग पाटील, तुषार रंधे, फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक श्रीराम, सचिव गोपालसिंग राजपूत, कोषाध्यक्ष उज्वलसिंह सिसोदिया, सदस्य दिलीप लोहार, मोहन पाटील, मिलींद पाटील, हेमराज राजपूत, प्रा.पी.एस.अंतुर्लीकर, योगेंद्र राजपूत या शेतकर्यांसह अनेकांच्या स्वाक्षरी आहेत.
151 कोटीचे कर्ज दाखविले
संचालक मंडळाने प्रसिध्द केलेल्या पत्रकात 151 कोटी रुपयांचे कर्ज दाखविले आहे. त्यातील जिल्हा बँक वगळता इतर कर्जे पूर्वीपासून चालत आलेली आहेत. त्यापैकी एकाही कर्जदाराने अडवणूक करुन कारखाना सुरु करण्यास मनाई केलेली नाही असे असतांना कर्जाचा बाऊ आणि बागूलबोवा उभा करुन जबाबदारीपासून पळ काढला जात आहे, याविषयी खुुलासा व्हावा, पत्रकात संचालक मंडळाने आमदार अमरीश पटेलांच्या कार्यशैलीवर विश्वास असल्याचे नमुद केले आहे.
मागील महिन्यात कारखाना सुरु करावा यासाठी तालुक्यातील शेतकर्यांतर्फे ‘शेतकरी विकास फाऊंडेशन’ यांनी निवेदन दिले होते. त्या निवेदनावर कारखाण्याचे चेअरमन, व्हा.चेअरमन यांनी संचालक मंडळाची मिटिंग न घेता परस्पर निवेदन प्रसिद्धीला दिले आहे. आमचा यावर आक्षेप आहे, कारण त्या निवेदनात जी कर्जाची आकडेवारी दिलेली आहे ती आजपर्यंत मिटिंगपुढे आलेली नाही. कोणाचे किती कर्ज आहे ते न सांगता 151 कोटीचा कर्जाचा आकडा दिला आहे. संचालक मंडळाची सभा घेतली असती तर आम्ही त्यावर सविस्तर चर्चा केली असती. म्हणून चेअरमन यांनी केलेल्या खुलासावर आम्ही दोन संचालक सहमत नाही.
-राहूल रंधे, डिगंबर माळ (संचालक शिसाका)