कारगिल युद्धाचा चुकीचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवला जात आहे

0

पुणे । पुराणातील युद्धाच्या गोष्टी आणि त्यातून घ्यायची शिकवण, आजही लहान मुलांच्या मनावर बिंबवली जाते. कारगिल युद्धाचे काही खरे तर काही चुकीचे वर्णन होते. त्यामुळे चुकीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे, अशी खंत डीआरडीओचे डायरेक्टर जनरल (निवृत्त) अनिल दातार यांनी व्यक्त केली. परंतु आपण त्यातून काय बोध घेतो, हे महत्त्वाचे आहे. या युद्धाचा योग्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचवू, असा निर्धार त्यांनी यावेळी केला.

सदाशिव पेठेतील निनाद पुणे व निनाद पतसंस्थेतर्फे कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रंगावली आणि तिरंगी ध्वज हातात घेऊन रेणुका स्वरुप मुलींच्या प्रशालेतील विद्यार्थीनींनी जल्लोष केला. कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष नगरसेवक राजेश येनपुरे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका जयश्री शिंदे, निनाद पुणे अध्यक्ष उदय जोशी, रामलिंग शिवणगे, सुरेश मांदळे, किशोर खैराटकर, पुरुषोत्तम वाईकर, रंजन पिंगळे, संजय देशपांडे, आप्पा जोगळेकर, दगडूशेठ बाहेती, किरण वाईकर आदी याप्रसंगी उपस्थित होते. रंगावलीकार सुनील सोनटक्के आणि वैशाली सोनटक्के यांनी ही रंगावली साकारली.

रंगावलीतून मानवंदना
भारत माता की जय…, वंदे मातरम्… अशा घोषणा देत हातात भारताचा तिरंगा ध्वज घेऊन शालेय विद्यार्थीनींनी कारगिल विजय दिनाचा विजयोत्सव साजरा केला. भारत-पाकिस्तान सीमेवर सुरू असलेली लढाई आणि अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेत शहीद झालेल्यांना यावेळी रंगावलीतून देखील अनोखी मानवंदना देण्यात आली. तेरा वैभव अमर रहे, भारत माँ अशा शब्दांत भारत मातेला आश्वासन देत सीमेवर रक्षण करणार्‍या सैनिकांचे चित्र रंगावलीतून उत्तमरित्या साकारण्यात आले होते.

…तर उत्कृष्ट सैनिक घडतील
डीआरडीओच्या माध्यमातून तयार केलेली रायफल कारगिलच्या पट्ट्यात सुरुळीतपणे चालते की नाही, याकरिता आम्हा शास्त्रज्ज्ञांची टीम तेथे गेली होती. उणे 50 तापमानात देशाच्या सीमांचे रक्षण करणार्‍या आपल्या सैनिकांची स्थिती आम्ही जवळून पाहिली आहे. सीमेप्रमाणे समाजात देखील अनेक शत्रू आहेत. त्यांना ओळखण्याकरीता आपण शिस्तबद्ध जीवन जगत सतर्क राहायला हवे. शिस्तबद्ध जीवनशैलीतूनच पुढचे उत्कृष्ट सैनिक घडतील, असा विश्वासही दातार यांनी यावेळी व्यक्त केला.

देशाच्या संरक्षणात पुण्याचा वाटा
कारगिल युद्धात वापरली गेलेली शस्त्रे पुण्यामध्ये साकारण्यात आली. याचा पुणेकरांना सार्थ अभिमान आहे. देशाच्या संरक्षणात पुण्याचा वाटा नेहमीच मोठा आहे. त्यामुळे अनिल दातार आणि डीआरडीओसारख्या संस्थांचा सन्मान आजच्या पिढीसमोर व्हायला हवा. तसेच अप्रत्यक्षरित्या देशाच्या संरक्षणात सहभागी होणार्‍यांविषयी आजच्या पिढीला कळायला हवे, असे उदय जोशी यांनी यावेळी सांगितले. अनुप जोशी यांनी सूत्रसंचालन केले.