जळगाव । शहरातील आकाशवाणी चौकात सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास सीटबेल्टच्या कारवाईवरून वाहतूक पोलीस व कारचालक यांच्यात जोरदार वाद झाल्याचा प्रकार घडला. दरम्यान, सुरू असलेल्या या वादाचे मोबाईलमध्ये चित्रण करणार्या तोताया पत्रकारानेही पोलीसांशी वाद घातला. अखेर चौकात सुरू असलेला वाद हा शहर वाहतुक शाखेच्या कार्यालयात पोहोचला. या ठिकाणीही त्या कारचालकाने पोलीसांवर पैसे मागितल्याचा आरोप करून वाद घातला. अखेर दोघांना शहर वाहतुक कार्यालयात नेल्यानंतर कारचालकावर दंडात्मक कारवाई करून सोडले तर त्याच बरोबर मोबाईलमध्ये चित्रण करणार्या तरूणालाही पोलीसांनी समज
देवून सोडले.
अन्.. अंंगावर धावून गेला
धरणगाव येथील निसार अहमद पटेल हा सोमवारी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास त्याची कार (क्र. एमएच-04-सीडी-7236) घेऊन ईच्छादेवी चौफुलीकडून आकाशवाणी चौफुलीकडे येत होता. त्यावेळी आकाशवाणी चौफुलीवर कर्तव्यावर असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी योगेश पवार, विनोद चौधरी यांनी निसार पटेलची कार थांबविली. त्याने शीट बेल्ट लावलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी 200 रुपये दंड भरण्यास सांगितले. त्यावरून योगेश आणि निसार यांच्यात वाद झाला. त्याने खाली उतरून पोलिस कर्मचार्यांशी हुज्जत घालून अरेरावी करून त्यांच्या अंगावर धावून गेला. त्यानंतर त्याने नगराध्यक्षांचा नातेवाईक असून त्यांना फोन लावून वाहतूक कर्मचार्यांना बोलण्यास सांगितले. विनोद चौधरी यांनी नगराध्यक्षांशी बोलून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतरही निसारची अरेरावी सुरूच होती. गाडीत बसलेल्या काही महिलांनीही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो समजण्याच्या मनस्थितीत नव्हता.
घटनेचे शुटींग करणार्याची अरेरावी
वाहतूक पोलिसांचा निसार पटेल याच्याशी वाद सुरू असताना या घटनेचे निलेश वर्मा नावाचा तरूण मोबाइलमध्ये शुटींग करीत होता. त्यावेळी पोलिस कर्मचारी व्ही. एस. जोशी यांनी त्याला शुटींग का करतोय? म्हणून विचारले. त्याने मी पत्रकार असल्याचे सांगितले. पोलीस कर्मचार्यांनी त्याला ओळखपत्र मागितले असता मी सोशल मीडीयाचे काम करतो, त्याला ओळखपत्राची गरज नसते असे त्याने रागात सांगितले. तर वर्मा याच्या दुचाकीचा क्रंमाक (एमएच.19.सीएन.359) विचित्र असल्याने त्याचीही दुचाकी पोलीसांनी ताब्यात घेतली. याचा राग आल्याने वर्मा याने हुज्जत घातली. यानंतर त्याला व निसार पटेल याला शहर वाहतुक शाखेत वाहतुक पोलीसांनी नेले.
दोघे वाहतूक शाखेच्या कार्यालयात…
वाहतूक पोलिस कर्मचार्यांशी वाद घालणार्या निसार पटेल आणि निलेश वर्मा यांना शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात घेऊन गेले. त्या ठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी कर्मचारी आणि कार चालकाची बाजु ऐकूण घेतली. त्यानंतर कारचालक निसार पटेल याच्यावर दंडात्मक कारवाई करून तंबी देऊन सोडून दिले. निलेश वर्मा यालाही समज देऊन सोडून दिले. मात्र, या झालेल्या वादामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. सध्या वाहनाधारक व वाहतुक पोलीसांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होत असल्याच्या घटनांमध्येही वाढ होतांना दिसून येत आहे. दरम्यान, वाहतूक पोलिस कर्मचार्यांशी वाद झालेला कार चालक निसार पटेल हा धरणगाव येथील पोलिस मित्र आहे. तर निलेश वर्मा हा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल विभागाशी संबधीत आहे.
बघ्यांची जमली गर्दी
वाहतूक पोलिस कर्मचार्यांशी कारचालक निसार पटेल व दुचाकीस्वार निलेश वर्मा या दोघांनी अरेरावी करत हुज्जत घातल्याने आकाशवाणी चौकात बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती. यावेळी नागरिकांनी वाद घालणार्या तरूणांना व पोलीसांना चांगलाच घेराव घालत सुरू असलेल्या वादाची गंमत पाहत होते. यानंतर वाहतुक पोलीसांनी दोघांना शहर वाहतुक कार्यालयात नेल्यानंतर गर्दी हटली. मात्र, सध्या वाहतुक पोलीस कर्मचार्यांना दिवसातून दहा मेमोचे टार्गेट दिले असल्याने पोलीसांकडून कारवाई करण्यात येत आहे. परंतू या कारवाईत पोलीस आणि वाहनधारकांमध्ये चांगलेच खटके उडत असल्याचे प्रकारही घडत आहेत.