कारचा कट लागल्याने पोलिसाने फोडली डॉक्टरांच्या वाहनाची काच

0

जळगाव। कुसुंबा गावात असलेल्या गतिरोधकावर बुधवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास भूलतज्ज्ञ डॉ. उदय पाटील यांनी कारची गती कमी केली. त्यामुळे मागून आलेल्या पोलिसाच्या दुचाकीला कट लागला. त्याचा राग येऊन पोलिस कर्मचार्‍याने लाथ मारुन डॉक्टरांच्या कारची काच फोडली. तसेच त्यांच्याशी अरेरावी करून शिविगाळही केली. दादागिरी करणारा पोलीस हा नंदूरबार येथे वायरलेस कक्षात कार्यरत आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. उदय पाटील हे बुधवारी साप्ताहीक सुटी असल्याने त्यांच्या कारने (क्र. एमएच-19-एइ-5100) जामनेर व तेथून त्यांच्या घरी बोदवडला जात होते. कुसुंबा गावात सकाळी 8 वाजता गतिरोधकावर त्यांनी कारची गती कमी केली. त्याचवेळी मागून नंदुरबार येथील बिनातारी संदेश विभागात कार्यरत असलेला प्रदीप देवरे नावाचा पोलिस कर्मचार्‍याच्या दुचाकीला (क्र. एमएच-19-बीएम-501) कारचा कट लागला. माझी चूक नाही असे डॉक्टर सांगत असताना संतापलेल्या पोलिसाने हाथाचा बुक्का व लाथ मारुन चालकाच्या दिशेचा कारचा काच फोडला. तसेच डॉ. पाटील यांच्याशी अरेरावी करून वाद घातला. त्यावेळी ग्रामस्थांनी मध्यस्थी करून वाद सोडविला.