कारची दुचाकीला धडक; चौघेजण गंभीर

0

चाकण : कंटेनरला ओव्हरटेक करून जात असताना कारची दुचाकीला धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील दोन चिमुकल्यांसह चौघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (दि. 9) सायंकाळी सहाच्या सुमारास शेलपिंपळगाव येथे झाला. पोलीस हवालदार विलास मच्छिंद्र गोसावी यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार अजय ज्ञानेश्‍वर खोल्लम (वय 38, रा. नवी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश बाळासाहेब दौंडकर (वय 30), रामदास कांताराम दौंडकर (वय 27, दोघे रा. कळुस संगमवाडी, ता. खेड), शुभ्रा रवींद्र वाजे (वय 4), तनुजा रवींद्र वाजे (वय 7, दोघे रा. वाजेवाडी, ता. शिरूर) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश दौंडकर शिक्रापूर-चाकण रोडवर पिंपळगावकडून चाकणच्या दिशेने होंडा सीबीझेड (एमएच 14 / डीएल 0232) दुचाकीवरून जात होते. त्यावेळी समोरच्या बाजूने अजय त्याच्या होंडा सिटी (एमएच 12 / जीएफ 3788) मधून जात होता. रस्त्यावरील कंटेनरला ओव्हरटेक करताना अजय याच्या कारने समोरून आलेल्या दौंडकर यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील चौघांना गंभीर दुखापत झाली. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात दोन्ही वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.