कारचे दरवाजे न उघडल्यामुळे जुळ्या बहिणींचा गुदमरून मृत्यू

0

गुडगाव : गुडगावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. गाडीत दोन तासांहून जास्त वेळ अडकल्यामुळे जुळ्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. उन्हाळी सुट्ट्यांसाठी या मुली आपल्या आजी आजोबांच्या घरी आल्या होत्या. जमालपूर गावातील पतोडी परिसरात त्यांचे आजोळ होते. या मुलींचे वडिल लष्करात असून मेरठमध्ये त्यांची नेमणुक झाली आहे.हर्षदा आणि हरिषिता अशी या जुळ्या बहिणींची नावे आहेत. घरामागे असणार्‍या हुंडाई कारमध्ये दोघीही बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर ही घटना समोर आली. या दोघी नेहमी येथे खेळत असायच्या. दोघींना तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने कुटुंबातील लोकांना धक्का बसला आहे.

मृत्यूही एकत्र
जेव्हा माझ्या मुली जन्माला आल्या तेव्हा कुटुंबातील सगळे आनंदी झाले होते. दोघींना मेरठमधील शाळेतही घातले होते. दोघी खोडकर आणि अभ्यासू होत्या, असे सांगत असताना वडिल गोविंद सिंह यांना भरुन आले. दोघी एकत्र जन्मल्यानंतर मृत्यूही एकत्रच होईल असा साधा विचारही कोणी करु शकत नव्हते असे आजोबा कनवल सिंग यांनी सांगितले.

मुलींनी गाडीचा दरवाजा आणि काचा उघडण्यासाठी प्रयत्न केल्याच्या खुणा आढळल्या आहेत. शनिवारी या मुली मेरठला आपल्या घरी परतणार होत्या. काही आठवड्यातच त्यांची शाळा सुरु होणार होती. अपघाताने या मुली कारच्या आतमध्ये लॉक झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. कारचे लॉक खराब झाले असून काचाही खाली येत नाहीत. चार वाजताच्या आसपास मुली जवळ कुठेच दिसत नसल्याचे पाहून सर्वांनी धावाधाव सुरु केली. सर्वात आधी सगळ्यांनी घरामागे पडलेल्या या कारकडे धाव घेतली होती.