कारच्या आपघातात दोन ठार

0
जळगाव – वाढदिवस साजरा केल्यानंतर हॉटेलमध्ये जेवण करून पुणे येथे घराकडे येत असताना महामार्गावर पडलेला मोठा दगड चुकविताना झालेल्या अपघातात राजेंद्र प्रकाश पाटील (वय-३०) व संध्या दिलीप पाटील (रा. दोन्ही रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या दोघांचा मृत्यू झाला. तर कारमधील अन्य ३ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात नारायणगावनजीक १३ सप्टेंबर रोजी रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरातील रामेश्वर कॉलनीत शोककळा पसरली होती.
१९ दिवसांपूर्वीच घेतली होती नवीन कार
राजेंद्र पाटील हा गेल्या काही दिवसांपासून पुण्याला नातेवाईकांकडे वास्तव्यास होता. काही महिने खाजगी काम केल्यानंतर २५ ऑगस्ट रोजी राजेंद्र याने नवीन कार खरेदी केली आणि ती भाडेतत्वावर एका कंपनीत देऊन स्वत:च त्यावर चालक म्हणून काम करायचा. राजेंद्र याची काकू संध्या पाटील यांची मुले पुण्याला नोकरीला असल्यामुळे त्या कधी पुण्यात तर कधी जळगावात राहत होत्या. सध्या त्या पुण्यात राजगुरूनगरला वास्तव्यास होत्या.
जेवणाला गेले अन् अपघात झाला
१२ सप्टेंबर रोजी राजेंद्र याच्या चुलत भावाचा मुलाचा वाढदिवस होता. त्यामुळे १३ सप्टेंबर रोजी रात्री राजेंद्र याच्यासह काकू, काकांची दोन मुले व आत्याचा मुलगा हे कारने (क्र. एमएच १४ जीयू ६५१२) पुण्यातील नारायण गावाकडे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले़ रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास जेवण करून घराकडे निघाले़ महामार्गावर चौपदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे मोठे दगड रस्त्यावर होते. त्याचा अंदाज न आल्याने राजेंद्र याने दगड चुकविण्यासाठी वळण घेतले. यावेळी कार दगडावर आदळून उलटली व खड्ड्यात कोसळली.
या भीषण अपघातात चालक राजेंद्र व संध्या पाटील यांचा जागीच मृत्यू झाला़ तर कारमधील अन्य तिघे जखमी झाले आहेत़ त्यांच्यावर नारायण गावाजवळील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. राजेंद्र याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील तसेच दोन भाऊ असा परिवार आहे़ तर संध्या पाटील यांच्या पश्चात पती, मुले असा परिवार आहे.