कार-दुचाकीचा अपघात; कारमधील अवैध दारु साठा जप्त

0

दोन जखमी; निवडणूक काळात दारु तस्करी जोमात

नवापूर :
एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंदुरबार दौर्‍याआधी होण्डाई कंपनीच्या(कार) गाडीत लाखो रुपयांची दारू भरून नवापूरमार्गे डांग जिल्ह्यात गुजरात राज्यात जात असताना पंचमुखी हनुमान मंदिराजवळ वेगात असलेल्या कार चालकाने दुचाकीला धड़क दिली.त्यात नवापूर येथील साईंरंग फोटो स्टुडिओचे मालक लग्न समारंभाची व्हीडिओ शुटींगला जात असताना या धडकेत दोघे रस्त्याच्या कड़ेला फेकले जावून गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. कार खड्ड्यात पडल्याने चालकही जखमी झालेला आहे. पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन वाहनात असलेली देशी-विदेशी कंपनीची अवैध दारू जप्त करण्यात आली. पुन्हा अवैध दारू तस्करी चव्हाटयावर आलेली दिसून आली. आचारसंहिता पथक तळ ठोकुन असताना होत असलेली दारू तस्करी दारूबंदी विभागाला आवाहन देणारी ठरली आहे.

जिल्ह्यात होत असलेल्या थातुर-मातुर कारवाया मात्र, महाराष्ट्र-गुजरात सीमेवर होत असलेली अवैध दारू तस्करीमुळे दारुबंदी विभाग अधिकारी आणि तस्करांची आर्थिक मिलीभगत असल्याशिवाय शक्य नसल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. घटनेत कार चालकास ताब्यात घेण्यात आले असून तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाटील आणि त्यांचे सहकारी करीत आहे.
पिंपळनेर रस्त्यावर रात्री-मध्यरात्री दारु आणि लाकुड तस्करी चालते.

शहरात काही ठिकाणी दारुचे गोडावुन असल्याचे नेहमीच चर्चिले जाते. गुजरातमध्ये दारुबंदी असल्याने गुजरातकडे महाराष्ट्रातून नवापूर मार्ग दारु तस्करी जोमात सुरु असते. अनेक लहान-मोठ्या वाहनातून दारु गुजरातकडे रवाना होत असते. ही वाहने वेगवान गतीने पोलिसांची नजर चुकवत धावत असतात. अशातून अनेक अपघात होत असतात. यातुन हा अपघात झाल्याचे उघड चर्चिले जात आहे. महाराष्ट्र व गुजरात सीमेवर दारु तस्करी नवीन नाही. यापूर्वीही वरिष्ठ विभागातील पथकांनी दारुसाठ्यावर धाडी टाकुन कारवाई केली आहे.