कारवाईचा बडगा उगारताच मिळकत कराचा भरणा

0

पुणे । मिळकतकर थकविणार्‍या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारताच गेल्या 10 दिवसात सुमारे 4 कोटी 52 लाख रुपयांचा मिळकतकर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. पालिकेच्या मिळकतकर विभागाचे प्रमुख उपायुक्त विलास कानडे यांनी ही माहिती दिली.

महापालिकेला अंदाजपत्रकानुसार अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार मिळकतकर विभागाने थकबाकीदार मिळकतींवर कारवाई सुरू केली आहे. मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी डिसेंबरपर्यंत महापालिकेला मिळकत करातून 829 कोटी 91 लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. यानंतर महापालिकेने थकबाकीदारांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे.मोठ्या प्रमाणावर मिळकतकर थकविणार्‍या महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या शिवाजीनगर येथील कार्यालयाला सील ठोकल्यानंतर त्यांनी 58 लाख थकबाकी भरली आहे. तसेच 58 लाख 25 हजार रुपये मिळकतकर थकविणार्‍या शिवाजीनगर येथील भाले इस्टेटला सील ठोकण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील एन. एच. सिक्युरिटीजला 3 लाख 61 रुपये, बिबवेवाडी येथील बाळासाहेब जाधव यांच्या मिळकतीला 2 लाख 65 हजार रुपये, बिबवेवाडी येथीलच कस्तुभ शहा यांच्या मिळकतीला 1 लाख 35 हजार रुपये, बालेवाडी येथील विश्‍वास घोडगे यांच्या मिळकतीला 3 लाख 67 हजार रुपये आणि पाषाण येथील रामहरी गणके यांनी चार मिळकतींचा 18 लाख 63 हजार रुपये थकविल्याप्रकरणी सील ठोकण्यात आले आहे. ज्या मिळकतकर धारकांनी थकीत कर भरला नाही, अशा सर्व मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यासाठी धडक मोहीम सुरूच राहाणार असल्याचे कानडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.