नवी दिल्ली/इस्लामाबाद : बळी घेणार्या व त्यांचे शीर कापून नेणार्या पाकिस्तानी लष्कराला भारताचे उपलष्करप्रमुख लेप्टनंट जनरल सरथ चांद यांनी चांगलेच ठणकावले. भारतीय जवानांची विटंबना करणार्या जवानांवर कठोर कारवाई करा; अन्यथा गंभीर परिणाम भोगण्यास तयार रहा. प्रत्युत्तराचे स्थळ अन् वेळ आम्ही ठरवू, असा खणखणीत इशाराच चांद यांनी एका जाहीर कार्यक्रमात पाकिस्तानला दिला. दरम्यान, भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही पाकिस्तानी उच्चायुक्तांना समन्स बजावून या घटनेचा तीव्र निषेध करत, संबंधितांवर कारवाईची मागणी केली. शहिदांच्या विटंबनेचे भारताकडे पुरावे असून, या घटनेने भारतीयांत संतापाची लाट उसळली आहे, असे खडेबोलही परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले.
पाक उच्चायुक्तांकडे तक्रार दाखल
पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत, भारतीय लष्कराच्या दोन चौक्यांवर हल्ला केला. तसेच, भारतीय हद्दीत सुमारे 250 मीटर आत घुसखोरी करून नायब सुबेदार परमजीत सिंग व बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांना ठार मारले; तसेच त्यांचे शीरही कापून नेले. या घटनेबाबतचे सर्व पुरावे भारताने गोळा केले असून, ते पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्याकडे सुपूर्त करत, पाक बॉर्डर एक्शन टीम (पीसीए)च्या ज्या जवानांनी हे कृत्य केले त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, या घटनेबद्दल देशवासीयांच्या मनांत तीव्र संताप असल्याची बाबही त्यांच्या कानावर घातली. पाकिस्तानने मात्र उलट्या बोंबा मारत असे काही घडलेच नाही, असा कांगावा केला आहे.
बीएसएफकडून चोख प्रत्युत्तर सुरू
दरम्यान, पाकिस्तानला भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेप्टनंट जनरल सरथ चांद यांनी रोखठोक भाषेत ठणकावले. या विटंबनेचा भारत नक्कीच बदला घेईल. तथापि, त्याचे स्थळ आणि वेळ आम्ही ठरवू. आम्ही काय करणार आहोत? हे सार्वजनिकरित्या सांगण्याची बाब नाही, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला दम भरला. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सीमा सुरक्षा दलाला पूर्णतः मोकळीक दिली असून, बीएसएफने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे सात जवान ठार झाल्याची माहिती हाती आली आहे. तथापि, पाकिस्तानने ही माहिती फेटाळून लावली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूने धुमश्चक्री सुरू आहे.