कारवाढीच्या चर्चेवरून सभागृहात रणकंदन

0
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत चतुर्थ वार्षिक कारवाढीच्या चर्चेवरून सभागृहात गोंधळ
शहर विकास समिती सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत चतुर्थ वार्षिक कारवाढीच्या चर्चेवरून सभागृहात रणकंदन माजले. तळेगाव शहर विकास व सुधारणा समितीचे सदस्य व सत्ताधारी महाआघाडीच्या सदस्यांनी प्रशासनास सभा कामकाज सुरु होण्याअगोदर प्रश्‍न विचारून धारेवर धरले. तसेच मागील सभेच्या सभावृतांकनाचे वाचन करावे व त्यास मंजुरी घ्यावी, अशी मागणी तळेगाव शहर विकास व सुधारणा समिती सदस्यांनी करताच सभा अध्यक्षांनी सभा अर्धातास तहकूब केली. अर्ध्या तासानंतर सभेचे कामकाज सुरु करताच मागील सभेचे इतिवृतांत न वाचताच अध्यक्षांनी या विषयाला मंजुरी दिल्याने जेष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे यांनी मागील सभेच्या सभावृतांची कागदपत्रे संतप्त होऊन सभागृहात भिरकावली. त्यामुळे सभागृहात काही काळ वातावरणात अतिशय तणाव निर्माण झाला होता.
पहिली सभा गोंधळात
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली या वर्षातील पहिली सर्वसाधारणसभा अतिशय गोंधळाच्या वातावरणामध्ये पार पडली. सभेस सुरुवात करण्याअगोदर भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते केशव वाडेकर, आचरेकर, सीमेवरील सैनिक, आदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आजच्या सर्वसाधारण सभेत बांधकाम विभाग-13, पाणीपुरवठा-5, नगररचना-10, उद्यानविभाग-7, विद्युतविभाग-13, आरोग्यविभाग-4, करविभाग-2, संगणक विभाग-3, अस्थापना विभाग-2, लेखाविभाग-2 इतर -11 असे एकूण 66 विषय होते.
वृत्तांत वाचण्याचा सभासदांचा आग्रह
सभेच्या सुरुवातीला कारवाढीसंदर्भात शासकीय पत्रव्यवहार सभागृहासमोर मांडण्याची तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीकडून जोरदार मागणी गटनेते किशोर भेगडे, ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे, संतोष भेगडे, अरुण माने यांनी केली. सत्ताधारी पक्षातील सुनील शेळके यांनी त्यास दुजोरा दिला. यावर सभागृहनेते सुशील सैंदाणे यांनी शासकीय पत्राचा हवाला देत चतुर्थ वार्षिक कर आकारणी कमी करण्याची आकडेवारी मांडली. यावर हे शासकीय पत्र सभागृहापुढे का ठेवण्यात आले नाही यावर विरोधी पक्षाने वादंग निर्माण केला. शासकीय पत्र आली असताना ती सभागृहापुढे न ठेवता सत्ताधारी पक्ष श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बापूसाहेब भेगडे व सहकार्‍यांनी यावेळी केला. सकाळी साडेअकरा वाजता सुरु झालेली सभा आजच्या सभेच्या विषयाशिवाय दुपारी दीड वाजेपर्यत प्राथमिक चर्चेत चालू होती. सभा सुरु झाल्यावर मागील सभा वृतांना कायम करणे हा पहिले काम आहे. सभेचा विषय सुरुवात करताच मागील सभा वृतांत सविस्तर वाचवा, असा आग्रह तळेगाव शहर विकास व सुधारणा समितीचे सदस्यांनी धरल्याने नगराध्यक्षांनी सभा कामकाज अर्धा तासासाठी तहकूब केले.
विषय न वाचता केले मंजुर
अर्ध्या तासानंतर पुन्हा सभा कामकाज सुरु झाले असताना मागील सभेचा वृतांत न वाचताच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तो मंजूर केला. यावर विरोधी पक्षाने मागील सभेचा वृतांत पूर्ण वाचण्याचा आग्रह धरला. न वाचता कसा मंजूर केला यावर जोरदार चर्चा करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत सत्ताधारी पक्ष पुढील विषयाचे वाचन करत असताना राग अनावर झाल्याने जेष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे यांनी मागील सभेचा सभा वृत्तांकनाची फाईल कागद पत्रासह सभागृहात भिरकावली. त्यामुळे सभा गृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी नगराध्यक्षांनी सभेच्या कामकाजातील पुढचे सर्व विषय न वाचता मंजूर झाल्याचे घोषित करून वंदेमातरम घेऊन सभेचे कामकाज संपले. सभेच्या कामकाजात जेष्ठ नगरसेविका सुलोचना आवारे, पक्षनेते सुशील सैंदाणे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, अमोल शेटे, अरुण भेगडे पाटील, हेमलता खळदे, शोभा भेगडे, कल्पना भोपळे, श्रीराम कुबेर, विरोधी गटातून बापूसाहेब भेगडे, किशोर भेगडे, अरुण माने, संतोष भेगडे, वैशाली दाभाडे, आनंद भेगडे सह आदि नगरसेवकांनी सहभाग दर्शविला.