भुसावळ । राज्यातील सर्व कारागृहांची सरप्राईज तपासणी केली जाणार असून त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल तसेच परीस्थिती व पैशांअभावी तुरूंगात अडकून असलेल्या सहा हजार कैद्यांना जामिन मिळण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन कैद्यांना दिलासा देणार असल्याची माहिती राज्याचे अपर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. भुसावळ येथील कोटेचा व्याख्यानमालेला ते आल्यानंतर त्यांनी भुसावळ कारागृहाला भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संवाद साधला असता ते बोलत होते. यावेळी पोलिस विभागाचे पोलिस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कैद्यांना आवाहन
भुसावळ कारागृहाची त्यांनी बारकाईने पाहणी केली तसेच माळी यांना काही सूचनाही त्यांनी केल्या. याप्रसंगी त्यांच्या हस्ते कैद्यांना पाटी व पेन्सिलचे वाटप करण्यात आले. साक्षर व्हा, कारागृहात भरपूर तुम्हाला वेळ आहे त्यामुळे यापुढील जीवन चांगल्या पद्धत्तीने जगा व सामाजिक स्तर उंचवा, असे आवाहन त्यांनी केले. प्रसंगी सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, जेलर जितेंद्र माळी आदी उपस्थित होते.
भुसावळात आस्थापनेसाठी प्रयत्न
भुसावळचे जेलर जितेंद्र माळी यांनी कारागृह अत्यंत व्यवस्थितरीत्या हाताळल्याची त्यांनी प्रशंसा करीत भुसावळ कारागृहासाठी आस्थापना मंजूरीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून त्यासाठी पुन्हा पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली तसेच प्रस्तावित 20 एकरांच्या जागेवर प्रशस्त जेल उभारणीसाठीदेखील प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कारागृहांची सरप्राईज व्हिजीट
राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांकडे अनेकदा मोबाईल आढळतात तसेच जळगाव कारागृहात झालेल्या अप्रिय घटनांचा संदर्भाबाबत त्यांना विचारणा केल्यानंतर उपाध्याय म्हणाले की, राज्यातील सर्वच कारागृहांची आम्ही पथकांमार्फत तपासणी करीत आहोत. अप्रिय घटना रोखण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. बॅरेक सर्वत्र बांधण्याचे आमचे प्रयत्न आहेत तसेच पैशांअभावी ज्या कैद्यांचा जामीन झाला नाहीत, अशी राज्यात किमान पाच ते सहा हजार प्रकरणे आहेत, अशा कैद्यांना जामीन मिळण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.