कारागृहातील अंगणवाडीत स्मार्ट अंगणवाडी संकल्पना राबविणार

0

मुंबई : राज्यातील सर्व कारागृहातील महिला बंदींच्या सहा वर्षाखालील बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या अंगणवाडीमध्ये स्मार्ट अंगणवाडी संकल्पना प्राधान्याने राबविणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. मुंडे यांच्या मंत्रालयीन दालनात महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.  यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांच्यासह आयोगाचे सदस्य संतोष शिंदे, विजय जाधव आणि प्रा. अस्मा शेख यांची उपस्थिती होती.

यावेळी मुंडे म्हणाल्या की, कारागृहातील महिला बंदींच्या बालकांना अंगणवाडीत त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा स्मार्ट संकल्पनेनुसार देण्यात येणार असून ही स्मार्ट अंगणवाडी संकल्पना राज्यात सर्व कारागृहातील अंगणवाडीपासून सुरु करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. आयोगाच्या शिष्टमंडळाबरोबर कारागृहातील बालकांच्या विविध समस्येवर मुंडे यांनी चर्चा केली. आयोगाच्या शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या बालकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील असे निर्देश मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी स्मार्ट अंगणवाडी कारागृहातील अंगणवाडीस प्राधान्यक्रम दिल्याबद्दल आभार मानले.