जिल्हा कारागृहातील पहाटेची घटना
चोरीच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपूर्वीच झाले दाखल
स्वयंपाकासाठी निघाले अन् कर्मचार्यांची नजर चुकवून झाले पसार
जळगाव – जिल्हा कारागृहात स्वयंपाक करण्यासाठी बॅरेकमधून बाहेर निघालेले दोन न्यायालयीन कोठडीतील कैदी कारागृहाच्या भिंतीवरुन उडी मारुन फरार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. शेषराव सुभाष सोनवणे (वय-28, रा. भिलवाडी ता.जामनेर) व रविंद्र भिमा मोरे (वय-29, रा.बोदवड) अशी कैदींची नावे आहेत. कैदी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील असून दोन महिन्यांपूर्वी न्यायालयीन कोठडीअंतर्गत कारागृहात दाखल झाले होते. घटनेने शहरासह जिल्ह्यात खबबळ उडाली या घटनेमुळे जिल्हा कारागृहाच्या सुरक्षेची लक्तरे वेशील टांगले असून कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.
कशी घडली घटना
शेषराव सोनवणे व रविंद्र मोरे हे दोन्ही कैदी 4 सप्टेंबर 2018 पासून चोरीच्या गुन्ह्यात कारागृहातील बॅरेक क्रमांक 5 मध्ये आहेत. कारागृहात दररोज न्यायालयीन कोठडीत असलेल्या बॅरेक क्रमांक 5 मधील 11 कैद्यांकडून स्वयंपाक बनवून घेतला जातो. नेहमीप्रमाणे कारागृह शिपाई बाळू उत्तम बोरसे व वासुदेव हिरामण बोरसे या दोघा कर्मचार्यांनी 11 जणांना पहाटे 5 वाजेच्या सुमारास बॅरेकच्या बाहेर काढले. दोघे कर्मचार्यांनी मेन गेटवर दूध घेण्यासाठी गेले असता सोनवणे व मोरे या दोघा कैद्यांनी कर्मचार्यांची नजर चुकवली व स्वयंपाकगृहापासून दहा ते पंधरा फुटावर असलेल्या संरक्षक भितींवरुन उडी मारुन पलायन केले. भिंतीजवळ एकाची चप्पल दिसून आल्याने ते पळून गेल्याची खात्री झाली.
कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांची फिर्याद
घटना घडल्यानंतर कर्मचार्यांनी परिसरात शोध घेतला. यानंतर कारागृहाचा अलार्म वाजविण्यात येवून वरिष्ठ अधिकार्यांना माहिती देण्यात आली. कैद्यांचा शोध न लागल्याने वरिष्ठ तुरूंगअधिकारी सुनील कुंवर हे फिर्याद देण्यासाठी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गेले. मात्र याठिकाणी पोलीस निरिक्षकांनी त्यांना घटना घडली त्यावेळी जे कर्मचारी कर्तव्यावर होते, त्यापैकी एकाच फिर्याद घेतली जाईल, त्यांना घेवून या असे सांगितले. त्यामुळे कुंवर फिर्याद न देताच रिकामे हाते परतले. अखेर दुपारी 3 वाजता बाळू बोरसे यांनी जिल्हापेठला फिर्याद दिली.
सीसीटीव्ही कॅमरेही बंद
अंतर्गत व बाह्य सुरक्षेसाठी कारागृहात 16 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत,मात्र अंतर्गत सर्व कॅमेरे बंद आहेत. त्याच्या दुरुस्तीबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे खुद्द कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर यांनी दिली. या कारागृहात पूर्ण जिल्ह्यातील गुन्ह्यातील तसेच शिक्षा झालेले आरोपी असतात. त्याच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ढिम्म कारागृह प्रशासनाचा कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.
200 कैद्यांची क्षमता अन् कारागृहात 469 कैदी
जिल्हा कारागृहाची 184 पुरुष व 16 महिला अशी 200 कैद्यांची क्षमता आहे. मात्र कारागृहात यापेक्षा तीप्पट म्हणजे 469 कैदी आहेत. त्यातही कारागृह अधीक्षकाचे पद रिक्त असून त्याचा प्रभारी पदभार वांढेकर यांच्याकडे आहे. तसेच कैद्यांच्या मानाने मनुष्यबळही कमी असून त्यातच तुरुंग अधिकार्यांची दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे सर्वांना सांभाळण्यास कसरत होत असल्याचेही यावेळी कारागृह अधीक्षकांनी सांगितले.
कर्मचार्यांचा कसूरी अहवाल पाठविणार
संबंधित प्रकरणी कर्तव्यावर तसेच जबाबदारी असलेल्या अधिकार्याची चौकशी करण्यात येईल. त्याचा चौकशी अहवाल तयार येईल. तसेच वरिष्ठ अधिकारी, कारागृह विशेष पोलीस महानिरिक्षक त्यांच्याकडे कर्मचार्यांचा कसूरी अहवाल पाठविण्यात येईल.-
-अनिल रघुनाथ वांढेकर, प्रभारी कारागृह अधीक्षक
दक्षता पथकामार्फत चौकशी करण्यात येईल. दोषींवर कारवाई करण्यात येईल. तपास सुरु असल्याने यावर अधिक भाष्य करणे उचित नाही -प्रभूदेसाई , उपमहापोलिसनिरिक्षक, कारागृह, औरंगाबाद