जळगाव । कारागृह अधीक्षक दिलीपसिंग डाबेराव व शिपाई बापू आमले यांना दोन हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 5 मे रोजी अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यांना न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यानंतर त्यांना अटी, शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला. प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी कारागृह अधीक्षकांनी दोन हजारांची लाच घेतली होती.
दर शुक्रवारी लावावी लागणार हजेरी
या प्रकरणी एसीबीचे डीवायएसपी पराग सोनवणे यांच्या पथकाने 5 मे रोजी सकाळी 8 वाजता सापळा रचून दोघांना रंगेहाथ अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यांना न्यायाधीश नांदेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर बचावपक्षातर्फे अॅड. अकील इस्माईल यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्याला सरकारतर्फे अॅड. मोहन देशपांडे हरकत घेतली. मात्र न्यायाधीश नांदेडकर यांनी डाबेराव यांना 2 लाखांच्या आणि आमले यांना 25 हजारांच्या वैयक्तीक जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. त्यात डाबेराव यांनी बुधवारी आणि आमले यांनी शुक्रवारी एसीबीच्या कार्यालयात हजेरी लावावी. तसेच या व्यतिरीक्त त्यांनी जळगाव शहरात येऊ नये अशा अटींवर जामीन मंजूर करण्यात आला.