कारागृह डीआयजी स्वाती साठेंना निलंबित करा!

0

मुंबई : भायखळा कारागृहातील कैदी मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी मंगळवारी विधानपरिषदेत जोरदार गोंधळ घातला. या प्रकरणात श्रीमती साठे यांना सहआरोपी करण्याची मागणीही विरोधकांनी केली. तथापि, साठे यांची महानिरीक्षकस्तरीय अधिकार्‍यांकडून चौकशी सुरु असून, चौकशीत त्या दोषी आढळल्या तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे निवेदन सरकारच्यावतीने यावेळी देण्यात आले. तसेच, सचिवस्तरीय अधिकार्‍यांमार्फत चौकशीचे आश्‍वासनही सरकारने दिले.

विधानपरिषदेत धनंजय मुंडे आक्रमक
मंजुळा शेट्ये या कैदी महिलेचा भायखळा तुरुंगात जेलर व पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी पोलिसांना कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरून आपल्याच सहकार्‍यांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्यावरून बरीच टीकाही झाली होती. हे प्रकरण दैनिक जनशक्तिनेही चव्हाट्यावर आणले होते. त्यामुळे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण विधानपरिषदेत उपस्थित केले. विरोधकही साठे यांच्या निलंबनासाठी चांगलेच आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. आरोपींना वाचवू पाहणार्‍या साठेंना निलंबित करून सहआरोपी करा, अशी मागणी विरोधकांनी रेटून धरली व गोंधळ घातला.

चौकशीत दोषी आढळल्या तर कारवाई : सरकार
राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी याप्रकरणी विधानपरिषदेत निवेदन केले. सद्या साठे यांची महानिरीक्षकस्तरीय अधिकार्‍यामार्फत चौकशी सुरु आहे. विरोधकांची मागणी असल्याने त्यांची सचिवदर्जाच्या अधिकार्‍यांमार्फत चौकशी करु, असे पाटील म्हणाले. चौकशी सुरु असल्याने साठेंच्या निलंबनास मात्र सरकारने नकार दिला. मंजुळा शेट्येप्रकरणी कारागृहाचे प्रभारी अधीक्षक तानाजी घरबुडवे आणि इंदूलकर यांना निलंबित करण्यात आले असून, आतापर्यंत 102 कैदी आणि प्रत्यक्षदर्शींचे जाबजबाब नोंदविले गेले आहेत. श्रीमती साठे यांची चौकशी सुरु असून, सायबर कायद्यान्वयेही त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत त्या दोषी आढळल्या तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन सरकारच्यावतीने देण्यात आले.