ठाणे । बँका तसेच पोलीस यंत्रणेकडून कुणालाही बँक खात्याची आणि डेबीट-क्रेडीट कार्डची माहिती देऊ नका असे आवाहन केले जात असले तरीही ऑनलाइन लुटीचे प्रकार थांबत नसल्याचे चित्र आहे. कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातल्या गोदरेज पार्कमध्ये राहणार्या अरुण खैरनार यांच्याबाबत असाच घडला आहे. खैरनार यांना त्यांच्या मोबाइलवर ९५७०३६६१६२ या क्रमांकावरून फोन आला. फोनवर बोलणार्याने स्वतःचे नाव दीपक शिंदे सांगून आपण स्टेट बँक ऑफ इंडियातून बोलत असल्याची थाप मारली. खैरनार यांनी सांगितले की, प्रथम त्याने खात्याची व एटीएम कार्डच्या पुढचा-मागच्या क्रमांकाची माहिती घेतली. तुमचे कार्ड ब्लॉक करण्यात आले आहे, असे सांगत त्याने आपल्याकडून सर्व माहिती मिळवली. त्यानंतर काही तासांनी बँक खात्यातून तब्बल ९ लाख ३२ हजार २१२ रुपये १९ पैसे वजा झाल्याचा मोबाइलवर मेसेज आल्याचे लक्षात आले. यानंतर खैरनार यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.