भाजप व विरोधी पक्षापुढे शिवसेना हतबल
मुंबई : देशातील श्रीमंत पालिका म्हणून मुंबई महापालिकेची ओळख असताना भाड्यावर रुग्णवाहिका गाड्या घेण्याची गरजच काय, रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेत पालिका प्रशासनाने स्वतः त्या खरेदी कराव्यात, अशी मागणी भाजप व विरोधी पक्ष नेत्यांनी लावून धरली. अखेर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मतदान घेत प्रस्ताव मंजूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बहुमताचा आकडा भाजप व विरोधी पक्षाच्या बाजूने असल्याने जाधव यांना अखेर सदर प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारासाठी पाठवण्याचा निर्णय घ्यावा लागला.पालिकेच्या आठ रुग्णालयांसाठी 5 कार्डियाक व 18 साधारण रुग्णवाहिका खरेदीसाठी मुंबई महापालिका प्रशासन 9 कोटी 96 लाख 69 हजार रुपये मोजून दोन वर्षांसाठी रुग्णवाहिका भाड्यावर घेणार असल्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आणला.
परंतु देशातील चार राज्यांचे बजेट असणार्या पालिकेला भाडेतत्वावर रुग्णवाहिका खरेदी करण्याची गरजच काय, प्रशासनाने स्वतःच्या मालकीच्या रुग्णवाहिका खरेदी कराव्यात, अशी मागणी भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी केली. आरोग्यासाठी पालिका तीन हजार कोटींपेक्षा अधिकची बजेटमध्ये तरतूद करते. एमआरआयसारख्या कोट्यवधी रुपयांच्या मशीन खरेदी करते, त्यामुळे भाड्यावर रुग्णवाहिका खरेदी करण्याऐवजी स्वतःच त्या खरेदी कराव्यात.
तसेच पालिका रुग्णालयात औषधे मिळत नाही, सुविधा खालावल्या आहेत. त्यामुळे आधी रुग्णांना दर्जेदार सुविधा द्याव्यात, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रविराजा यांनी स्थायी समितीत केली. पालिका प्रशासन खासगीकरणाकडे पाऊल टाकत असून भाड्यावर घेणार्या रग्णवाहिकांमध्ये सुविधा काय, डॉक्टर, परिचारीका किती, असा प्रश्न उपस्थित करत प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारासाठी पाठवण्याची मागणी त्यांनी केली.
कार्डियाक रुग्णवाहिका यापूर्वीही पालिकेने वापरल्या असून रुग्णांसाठी फार उपयोगी ठरते. मात्र या रुग्णवाहिकांना 108 च्या धर्तीवर मोबाईल नंबर मुंबईकरांना उपलब्ध करावा, अशी मागणी समिती सदस्य राजूल पटेल यांनी केली. तर पालिका रुग्णालयात सध्या असलेल्या रुग्णावाहिका रुग्णांसाठी वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे या कार्डियाक रुग्णवाहिका खरेदी करताना नियोजन करावे, अशी मागणी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी केली.गेल्या आठ वर्षांपासून रुग्णालयात कार्डियाक रुग्णावाहिका होत्या. मात्र, त्या गाड्यांचे आयुर्मान संपल्याने भंगारात काढल्या.