पुणे : मुंबईहून पुण्याला येणार्या दर्शन पाटील (वय 36) या तरुणाने खालापूर टोल नाक्यावर आपल्या डेबिट कार्डद्वारे 230 रुपयांचा टोल भरला. परंतु, थोड्याच वेळात या तरुणाला आपल्या खात्यातून चक्क 87 हजार कपात झाल्याचा संदेश आल्यानंतर या तरुणाच्या पायाखालची वाळू सरकली. त्याने तातडीने आपल्या बँकेच्या विक्री अधिकार्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी हडपसर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. डेबिटकार्डच्या पिन व गोपनीय माहितीची टोल प्लाझावर चोरी होत असल्याची धक्कादायक बाब यानिमित्ताने उघडकीस आली असून, हा घोटाळा मोठा असल्याचा संशय सायबरक्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास प्रकार घडला होता.
अवघ्या काही मिनिटांत खाते साफ
याबाबत माहिती देताना दर्शन पाटील यांनी सांगितले, की आपण मुंबईहून पुण्याकडे येत होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आपण खालापूर टोल फ्लाझावर 230 रुपयांचा टोल भरला. त्यानंतर तातडीने आपणास 230 रुपये खात्यातून कपात झाल्याचा संदेश मोबाईलवर आला. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पुन्हा 20 हजार रुपये कपात करण्यात आल्याचा मॅसेज प्राप्त झाला. त्यानंतर काही मिनिटातच सहा असे संदेश प्राप्त झाले. त्यामुळे एकूण 87 हजार रुपये उडविण्यात आल्याचे निदर्शनास आले. 8.34 वाजेपर्यंत सायबर गुन्हेगार इतके मोठे पैसे उडविल्यानंतरही शांत झाले नाहीत. त्यांनी दहा रुपयांचे एक आणि शंभर रुपयांचे तीन वेळा ट्रान्झक्शनही केले. या प्रकरामुळे आपणास मोठा धक्का बसला. आपण, तातडीने ही बाब बँकेच्या विक्री अधिकार्याच्या कानावर टाकली व कार्ड ब्लॉक करण्यास सांगितले, असेही दर्शन पाटील म्हणाले. प्लाझावर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड स्वाईप केल्यानंतर पिन क्रमांक व इतर गोपनीय माहिती लीक होत असल्याचेही या निमित्ताने उघड झाले असून, याप्रकरणी हडपसर पोलिसांत रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मोठे रॅकेट असल्याचा संशय
खालापूर टोल नाक्यावर खिडकीच्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असून, कार्ड स्वाईप केल्यानंतर पिन क्रमांक लिक होत असल्याचा आरोपही दर्शन पाटील यांनी केला. शनिवारी सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेच्यादरम्यान आपण कुठेही डेबिट कार्डचा वापर केलेला नाही. त्यामुळे हा प्रकार खालापूर टोल नाक्यावरच झालेला आहे. सप्टेंबर 11 तारखेपर्यंत आपणास एकदाही ओटीपीबाबत ईमेल किंवा संदेश आलेला नाही, असेही पाटील म्हणाले. ओटीपीशिवाय अशाप्रकारे ट्रान्झक्शन कसे काय होऊ शकते? असा सवालही त्यांनी केला. टोल नाक्यावर डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा पासवर्ड लिक करणारी यंत्रणा असावी, असा संशय असून, हे एक मोठे रॅकेट असावे, अशी शक्यता सायबर पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. हडपसर पोलिस पुढील तपास करत आहेत.