कार्तिकी एकादशीनिमित्त अलंकापुरी भाविकांच्या स्वागतास सज्ज 

0
राज्यभरातून या सोहळ्यासाठी लाखो भाविक अलंकापुरीत दाखल झाले 
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत सोमवारी (दि.3) श्रींचे 723 व्या संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी एकादशी हरीनाम गजरात साजरी होत आहे. राज्य परिसरातून या सोहळ्यासाठी लाखो भाविक अलंकापुरीत दाखल झाले आहेत. दरम्यान नवमी निमित्त शनिवारी (दि.1) माऊली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमात श्रींना पवमान अभिषेक व दुधारती, भाविकांचे महापूजा, महानैवेद्य, विणा मंडपात बाबासाहेब देहूकर यांच्या कीर्तनसेवेनंतर धुपारती व त्यानंतर वासकर महाराज यांच्यावतीने परंपरेने कीर्तनसेवा रुजू झाली.
दशमी दिनी  रविवारी (दि.2) माऊली मंदिरात श्रीना पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांच्या महापूजा, दिंडीची मंदिर आणि नगर प्रदक्षिणा, श्रींना महानैवेद्य, विणा मंडपात ह.भ.प.गगुकाका शिरवळकर आणि ह.भ.प.धोंडोपंतदादा अत्रे यांच्यावतीने कीर्तन सेवा, धुपारती नंतर ह.भ.प.वासकर महाराज आणि ह.भ.प.वाल्हेकर महाराज यांच्यातर्फे कीर्तन सेवा हरीनाम गजरात होणार आहे. भाविकांना आळंदी कार्तिकी यात्रेत कीर्तन, प्रवचन, संगीत भजन, जागर अशा धार्मिक उपक्रमातून श्रवण सुखाची पर्वणी लाभली आहे. यात्रेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा माऊली मंदिरात सुरु आहे. यास भाविक वारकरीही भक्ती भाव जोपासत हजेरी लावताना दिसत आहेत.
वेदमंत्रांच्या जयघोषात अभिषेक
सोमवारी (दि.3) सोहळ्यात कार्तिकी एकादशी साजरी होत आहे. यानिमित्त पहाटे पवमान अभिषेक, धुपारती, 11 ब्रम्हवृंदांचे वेदमंत्र जयघोष, श्रींना महानैवेद्य, श्रींची पालखीची नगर प्रदक्षिणा, धुपारती, परंपरेने ह.भ.प.संतोष महाराज मोझे यांच्यावतीने जागर होणार आहे. आळंदी नगरपालिका, आळंदी देवस्थान, पुणे महसुल, पोलीस, राज्य आरोग्य सेवा, महावितरण सेवा, विविध सेवाभावी संस्था यांच्यावतीने भाविक-नागरिक यांचे साठी विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.यासाठी लगबग दिसत आहे. आळंदी मंदिर, इंद्रायणी नदीघाट परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे लक्षवेधी ठरली आहे. ठिकठिकाणी राहुट्यांमधून भजन, कीर्तन, प्रवचन सेवेत रंग भरला आहे. आळंदी प्रभावी स्वच्छता गृहात व्यवस्था करण्यात आली आहे. आळंदी यात्रा काळात काही ठिकाणी मोफत सुविधा ठेवण्यात आली आहे. भाविकांच्यात नाराजी निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत असल्याचे नियोजन प्रशासनाने आळंदीत केले आहे.
वारकर्‍यांची गर्दी वाढली 
प्रदक्षिणा रस्ता आणि गोपाळपुरा, जुना आणि नवीन पूल परिसरात वारकर्‍यांची गर्दी वाढली आहे. इंद्रायणीत स्नान केल्यानंतर भाविक माऊलींच्या समाधी दर्शनासाठी मंदिराकडे जात होते. भक्ती सोपानपूल दर्शन बारीतून मोठी रांग लागली होती. महापूजेची लगबग सुरू होती. इंद्रायणी घाटावर, देऊळवाड्या बाहेर मठ, धर्मशाळामध्ये वारकर्‍यांचे खेळ रंगले होते. वारकर्‍यांनी दिंड्यातून नगर प्रदक्षिणा केली. वारकर्‍यांचा आनंद भक्ती ओसंडून वाहत होती. माऊलींच्या मानाच्या पालखी सोहळ्यातील दिंड्यांचे आगमन आळंदीत झाले आहे. श्रींच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करीत होते. दुपारनंतर दर्शनास मंदिरात गर्दी देखील वाढली.
भाविकांना सेवा सुविधा 
आळंदी नगरपरिषदेच्यावतीने इंद्रायणी नदी घाटावर महिलांसाठी चेंजिंग रूमची व्यवस्था दुतर्फा करण्यात आली आहे. आळंदी पालिकेने शहरातील विविध ठिकाणची रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे पथारी व्यवसायिकांची दुकाने हटविल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाचे नियंत्रणात अतिक्रमणे काढण्याचे काम सुरु आहे. यात्रा काळात देखील रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचनादेश देण्यात आले आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेत हस्तक्षेप करणार्‍या नगरसेवक पदाधिकार्‍यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने पदाधिकार्‍यांनी या कारवाईस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
तीर्थक्षेत्र आळंदीत भाविकांच्या सुरक्षेसाठी सी.सी.टि व्ही.कॅमेरे तसेच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.भाविक-नागरिकांच्या सुरक्षेस तसेच सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी माऊली मंदिरात घातपात विरोधी पथकाकडून पाहणी देखील नियमितपणे करण्यात येत आहे. शहरात रस्त्यावरील पाण्याचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी नळजोड वाहिन्यांची देखभाल दुरुस्ती पालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली आहे. माऊली मंदिर परिसरातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यात आल्याने रस्ते प्रशस्त झाले. मात्र भराव रस्त्याची दुरावस्था कायम राहिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना गती देण्यात आल्याने आळंदीत रस्ते विकास साधला गेला.