नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया लाचप्रकरणात तुरुंगात असलेला माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्तिचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. कार्ति याला देशाबाहेर न जाण्याचे व पुराव्यासोबत छेडछाड न करण्याचे आदेश देत, न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले आहेत.
आयएनएक्स मीडियामध्ये विदेशी गुंतवणुकीला परवानगी मिळवून देण्यासाठी कार्ति याने लाच घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तब्बल 23 दिवस तुरुंगात काढल्यानंतर शुक्रवारी कार्तिचा जामीन मंजूर करण्यात आला. कार्ति चिदंबरम याला दहा लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने कार्तिला देशाबाहेर जाण्यावर बंदी घातली आहे. तसेच पुराव्यासोबत छेडछाड न करण्याचे व बँक खाती बंद न करण्याचे आदेश दिले आहेत. कार्तिला लंडनवरून परतल्यानंतर चेन्नई विमानतळावरच 1 मार्चला अटक करण्यात आली होती.