कार्ती चिदंबरमला दिलासा नाहीच!

0

सर्वोच्च न्यायालयाचा अटकेबाबत संरक्षण देण्यास नकार
सीबीआयनंतर ईडी करू शकते अटक

नवी दिल्ली : सीबीआय कोठडीत असलेल्या कार्ती चिदंबरमला सक्तवसुली संचलनलयाकडून अटक होणार नाही असे संरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. कार्ती चिदंबरमसाठी हा धक्का असून, सीबीआयची चौकशी झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालय कार्तीला केव्हाही ताब्यात घेऊ शकते. मंगळवारी कार्तीच्या कोठडीची मुदत संपली. कार्तीची बाजू कपिल सिब्बल मांडत असून, त्यांनी सीबीआयची कोठडी संपल्यावर सक्तवसुली संचालनालय कोठडी मागेल ती देऊ नये, अशी जोरदार मागणी सर्वोच्च न्यायालयात केली.

आता 8 मार्चरोजी सुनावणी
कार्तीच्या वकीलांच्या जोरदार युक्तिवादानंतर सक्तवसुली संचलनालयाच्या कारवाईसंदर्भात याचिका ऐकण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दाखवली मात्र, कार्तीला एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने ताब्यात घेण्यापासून संरक्षण मिळावे ही मागणी नाकारली. दरम्यान, सीबीआयने दिल्ली न्यायालयाकडे कार्तीच्या कोठडीची मुदत आठ दिवसांनी वाढवून मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कार्तीची याचिका दाखल करून घेतली, त्यानुसार सक्तवसुली संचालनालयालाही समन्स बजावले, मात्र कार्तीविरोधात सुरू असलेल्या तपासावर या नोटिसीचा काहीही परिणाम होणार नाही असे स्पष्ट केले. तसेच कार्तीला ईडीच्या अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाची आता 8 मार्च रोजी सुनावणी आहे. कार्तीला तीन कोटी रुपयांची लाच दिल्याचे आयएनएक्स मीडियाचे पीटर व इंद्राणी मुखर्जीया यांनी सांगितले होते, त्यावरून त्याला सीबीआयने अटक केली आहे.

कार्तीची अटक हे राजकीय षडयंत्र
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा कार्ती मुलगा असून, आयएनएक्स मीडिया या कंपनीला संशयास्पदरीत्या अनेक मंजुर्‍या राजकीय वजन वापरून व पैसे घेऊन दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आपण सुरक्षा यंत्रणांशी संपूर्णपणे सहकार्य करत आहोत, परंतु विषयाशी संबंध नसलेली चौकशी करण्यात येत असल्याचा आरोप कार्तीने केला आहे. दरम्यान, काँग्रेसनेही कार्तीची अटक हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला आहे.