शिरपूर। केंद्रात व राज्यात भाजपाने सत्ता मिळविली असली तरी सत्तेची हवा ही कुणीही डाक्यात येवू दिली नाही. पक्षामध्ये काम करीत असतांना सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम केले जाते. त्यासाठी फक्त एकनिष्ठता ही आवश्यक असते. या एकनिष्ठतेचीच तुलना करून अनेकांना पद दिली गेली आहेत. असाच न्याय हा उंटावद येथील रामकृष्ण विठोबा महाजन (दोरीक) यांना भाजपा शेतकरी आघाडीचा जिल्हा चिटणीस पद देवून केला असल्याचे प्रतीपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले. ते उंटावद येथील गायत्री मंदिराच्या प्रांगणात झालेल्या महाजन यांच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षीयस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस अरूण धोबी, जिल्हा उपाध्यक्ष किशोर माळी,मिलींद पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, संजय आसापुरे, तालुकाध्यक्ष राहुल रंधे, तालुका प्रभारी डॉ.जितेंद्र ठाकूर, जयवंत पाटील, अविनाश शिंपी, मुबीन शेख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीस गायत्री मातेचे पुजन करून भाजपाच्या वतीने रामकृष्ण महाजन यांचा सत्कार करण्यात आला.
काम करतांना तळ्यात-मळ्यात भूमिका नको
बबनराव चौधरी यांनी सांगितले की, उंटावद गावाने 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ते उमेदवार असतांना सर्वात जास्त मतदान दिले होते. 18 राज्यांमध्ये भाजपाने सत्ता मिळविली आहे. सत्तेत असून देखील कोणीही सत्तेची हवा ही डोक्यात शिरू दिली नाही. अरूण धोबी यांनी भाजपात घराणेशाहीला व धनदौलत, जात-पात याला महत्व न देता काम करणार्याला न्याय देण्याचे काम भाजपात केले जात असल्याचे सांगितले. डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी उंटावद हे गाव शेतीनिष्ठ असल्याने प्रत्येकजण प्रयत्नशिल आहे हे सांगत भाजपाने शेतकर्यांसाठी राबविलेल्या विविध धोरणांची त्यांनी माहिती दिली. राहूल रंधे यांनी पक्षांसाठी काम करीत असतांना तळ्यात-मळ्यात अशी भूमिका कोणीही घेवू नये असे आवाहन केले. रामकृष्ण महाजन हे अनेक वर्षापासून भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून काम करीत होते. त्यांना पक्षाने मोठी संधी दिली आहे. यावेळी रामकृष्ण महाजन यांनी सत्काराला उत्तर देतांना माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाही असे आश्वासन दिले. सूत्रसंचालन अॅड.ललेश चौधरी यांनी केले.