मुंबईप्रमाणे आता पुण्यातही विविध विषयांवरील शिबिरे, कार्यशाळा, व्याख्याने होत आहेत. ही आशादायक गोष्ट आहे. या कार्यकर्मांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घेतल्यास आपापल्या व्यक्तिमत्त्वाला पोषक अशा गोष्टी त्यातून घडत जातील. या कार्यक्रमांचे विषय विविध असतात. आपल्याला आवडणार्या विषयाच्या कार्यक्रमात आपण सहभागी व्हावे. यामध्ये दोन प्रकार तुम्हाला आढळतील. एक म्हणजे, ठरावीक रक्कम भरून सहभागी होणे आणि दुसरी मोफत. रक्कम भरून आपल्या आवडीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यास तिथे जास्त लाभ मिळण्याची शक्यता असते. आपल्या अभ्यासक्रमात साचेबंध गोष्टींचा अंतर्भाव केल्याने आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आपल्याला शाळाबाह्य उपक्रमांवर जास्त भर द्यावा लागतो. हे उपक्रम विद्यार्थी, उद्योजक, पालक आदींना निश्चितच लाभदायी ठरणारे असतात. विविध कार्यक्रम, शिबिरे, कार्यशाळा यातून आपल्याला असे खाद्य मिळत असते त्यातून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला गवसतो. पुस्तकांचे वाचन असो, एखादा चित्रपट असो, त्यातून प्रेरणा घेत असताना कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला विसरू नका. आपल्या मनाची मरगळ दूर करण्यासाठी असे कार्यक्रम म्हणजे मनाला मिळणारे टॉनिक!
आरंभी मिळेल त्या कार्यक्रमांना जाण्याची सवय लावावी. त्यानंतर तुमची आवड काय आहे हे तुम्हाला लक्षात येईल. हा पोक्तपणा आला की नंतर त्या विषयानुरूप कार्यक्रमाला जाण्याचे स्वातंत्र्य घ्यावे. पण वक्तृत्व, कथाकथन, सूत्रसंचालन यांसारख्या विषयात आवड नसली तरी जरूर जावे. कारण इथे कसे बोलावे सभाधीटपणा आवाजाची पट्टी कशी राखावी भावना व्यक्त करताना संवादाचा बाज कसा राखावा आदींचे निदान मार्गदर्शन तरी मिळते. याशिवाय विविध विषय कानांवर पडतात. शिक्षकी पेशात असलेल्यांना तर असे कार्यक्रम म्हणजे पर्वणीच. व्यक्तिमत्त्व विकासावर पुणे, पिंपरी-चिंचवड या ठिकठिकाणी कार्यशाळा, शिबिरे आयोजित केली जातात. त्यात वयोगटाचे बंधन नसेल, तर खुशाल त्यात सहभागी व्हावे. त्यात सूत्रधार तुमच्याकडून विविध खेळ घेत असतो, नवीन नवीन कोडी तुम्हाला सोडवायची संधी मिळते. एकूण काय तर जीवनाकडे व्यापक दृष्टीने बघण्याची संधी यातून मिळत जाते. या कार्यशाळा विद्यार्थी वयोगटात खूपच आवश्यक असतात. आजकाल समस्यांना आपणाला सामोरे जावे लागते. अशांवर उत्तरं शोधण्याचा प्रयत्न फार थोडे करू पाहतात. आपल्याकडे रस्ता प्रथम त्यानंतर त्यामुळे आलेल्या समस्यांचा विचार करण्याची विचित्र पद्धती आहे. यातून वेळ फुकट जातोच शिवाय पैशांची नासाडी होते ती वेगळीच. त्याऐवजी कार्यशाळा आयोजित करून समस्या आणि त्यावर उपाय यावर साधकबाधक चर्चा घडवून आणल्यास कितीतरी प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच नाहीसे होतील.
एका कार्यशाळेत कावळ्याचे मडक्यातील पाणी पिण्याचे जुने तंत्र चित्रातून दाखवले गेले. आता कावळा आधुनिक झालेला आहे तो आपल्या समस्येकडे नव्या दृष्टीतून कसा पाहतो? हे दाखवण्यासाठी दुसरे चित्र दाखवले गेले. त्यात कावळा चक्क स्ट्रॉच्या मदतीने पाणी पीत असल्याचे दाखवले होते. यानंतर कार्यशाळेत समस्यांकडे कसे पाहता येते? … यावर सुंदर विवेचन केले गेले. शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते गृहस्थाश्रमी माणसापर्यंत समस्या पाचवीला पुजलेल्या. त्या दूर करण्यासाठी काहीवेळा आपल्याला इतरांची मदत घ्यावी लागते, सल्ला घ्यावा लागतो, तर काहीवेळा आपल्याआपण अनुभवाच्या जोरावर म्हणा की स्वत:ला सुचलेल्या उपायाने त्या दूर करतो. काहीवेळा चक्क दुर्लक्षित करून काळावर सोडून देतो. काहीही असो समस्या ही असतेच. शाळेत जाणार्यांची खात्रीची समस्या असते, अभ्यास लक्षात राहत नाही, एकाग्रता जमत नाही, एखाद्या विषयाची भीती वाटते इत्यादी. परंतु, सरावाने या गोष्टी सहज शक्य आहे हे आपल्या लक्षात येते. कार्यशाळेत जे शिकवले गेले त्यानुसार आपण आपली समस्या कोणती आहे, हे प्रथम लिहून घ्या. त्यावर तुम्ही शोधलेला उपाय कोणता? जर त्याने काही होत नसेल, तर अनुभवी माणसाकडून सुचवलेला उपाय पडताळून घ्या. उदा. एखाद्याचा पहाटेला अभ्यास होत नसेल त्याने आपली अभ्यासाची वेळ बदलावी. घरी गोंगाट असेल, शेजारी पाजारी गडबड असेल, तर अन्यत्र जाऊन अभ्यास करावा. एकूण काय तर उजळणीचे तंत्र बदलून त्यावर उपाय शोधावा. ही पद्धत कुठल्याही पदावरील व्यक्तीला उपयुक्त ठरेल. समस्येला सामोरे गेल्याशिवाय तुमच्यातील क्षमता, कौशल्ये तुम्हाला कशी कळतील हा त्यामागचा प्रमुख उद्देश. या वेळी सहभागी मंडळींनी गटवार एखादी समस्या शोधायची व त्यावर चर्चा करून उपायही सुचवावेत. एका लहान मुलाचा प्लास्टिकचा चेंडू रीत्या बॅरलमध्ये पडलेला आहे तो त्याला काढायचा आहे. बॅरल आडवा करण्याइतपत मुलाची शक्ती नाही तो घरी एकटाच आहे. एक उपाय होता तो म्हणजे शेजारी जाऊन कुणाची तरी मदत घेणे, पण शेजारी कुणी नसेल तर? मग एकाने पर्याय सांगितला. त्याने नळाच्या तोटीला पाइप लावून पाणी बॅरलमध्ये भरावे. जसजसे पाणी भरेल तसतसा त्याचा चेंडू वरती येईल. विविध कार्यक्रम, कार्यशाळांतून आपल्या आयुष्याला पुरेल एवढी शिदोरी मिळू शकते. जीवनाला उभारी देण्याचे काम यातून घडते, हे मात्र नक्की.
किरण चौधरी
9823312005