कार्यालयाच्या आवारातील स्वच्छतागृहाला लागली आग

0

महामेट्रोकडे नाही कोणतीही अग्निशमन यंत्रणा

पिंपरी : फुगेवाडी येथील महानगर मेट्रो कार्यालयाच्या आवारात असलेल्या फायबरच्या स्वच्छतागृहाला आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच हे स्वच्छतागृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मात्र या घटनेमुळे महामेट्रोकडे असलेल्या क्विक रिस्पॉन्स फोर्सकडे स्वतःची अग्निशमन यंत्रणा नाही किंवा याबाबतची प्राथमिक उपकरणेही नाहीत हे वास्तव आज समोर आले.

शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फुगेवाडी येथील महामेट्रो कार्यालयाच्या आवारात असलेल्या फायबरच्या स्वच्छतागृहाला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच काहीवेळातच पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचा एका बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र तोपर्यंत महामेट्रोकडे असलेल्या क्विक रिस्पॉन्स फोर्सकडे आग विझविण्याचे कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे सर्वजण या आगीकडे पाहत बसण्याशिवाय काहीही करू शकले नाहीत. त्यामुळे आगीचा बंब पोहोचेपर्यंत फायबरचे स्वच्छतागृह आगीमध्ये जळून खाक झाले.

पुणे मेट्रोमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक प्रश्‍न सोडविला जाणार हे नक्की. पण एवढे मोठे काम करताना अपघात होणार, कदाचित आग लागणार याची शक्यता नाकारता येत नाही. मग अशा संकटाशी सामना करण्यासाठी महामेट्रोच्या क्विक रिस्पॉन्स फोर्सकडे आग विझविण्याची साधनसामुग्री नाही हे वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे. महामेट्रोकडे खूप कामगार काम करीत आहेत. त्यामुळे असे जर आग लागण्याचे प्रमाण वाढले तरी या मजुरांची सुरक्षा वार्‍यावर आहे. मेट्रोचे काम चालू आहे त्यामुळे मजुरांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मजुरांच्या सुरक्षिततेचे काही उपाय करणे गरजेचे आहे.