कार्लामध्ये 51 तर पुण्यात 10 बेडची व्यवस्था असलेले देशातील पहिले रुग्णालय

0

स्टेम सेल थेरपी रुग्णालय रुग्णांच्या सेवेत दाखल

केंद्रीय आयुष मंत्री नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन

लोणावळा : भारतातील पहिले आयुर्वेद मेडिसीनल प्लांट स्टेम सेल थेरपी रुग्णालय कार्ला फाटा येथे सुरु झाले आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. लोणावळा कार्ला फाटा येथे 51 तर पुणे येथे 10 बेडची व्यवस्था असलेले अशा प्रकारचे हे रुग्णालय भारतातील पहिले रुग्णालय आहे. यावेळी घेण्यात आलेल्या रुग्ण मेळाव्यात 500 पेक्षा अधिक रुग्णांनी दुर्धर आजारावर कायमस्वरूपी इलाज झाल्याचे सांगितले.

विविध विभाग सुरू
रुग्णालयात आयुर्वेद मेडिसीनल प्लांट स्टेम सेल थेरपी विभाग, आयुर्वेद पंचकर्म विभाग, योग प्राणायम व निसर्गोपचार विभाग, पूर्णतः नैसर्गिक प्रसूती व्यवस्था (दाईमार्फत) व माता-बालसंगोपन विभाग, प्रसूतिकालीन व इतर अपघातानंतर उद्भवणार्‍या विकृतीसाठी तसेच मेंदू विकासासाठी विशेष विभाग यांसारखे विभाग सुरु करण्यात आले आहेत. या विविध विभागांतर्गत सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, ब्रेन अ‍ॅट्रॉफी, मोटर न्यूरॉन डिसीज, डोळ्यांचे विकार, किडनी, डायबेटीस, अपघाती अपंगत्व, संतती प्राप्ती व पाळी नियमन, संधीवात, थायरॉईड, प्रसूती कालीन व इतर अपघातानंतर उद्भवणार्‍या विकृती आणि असाध्य व्याधींवर उपचार करण्यात येत आहेत. सेरेबल पाल्सी, मसक्युलर डिस्ट्रॉफी, डीएमडी स्पायनल ऍट्रोफी, एमएनडी, ब्रेन ऍट्रोफी, हायपर, स्वमग्न, अपघाती खराबी, शुगर टाईप एक आणि दोन, किडनी, एव्हीएन, मानसिक आजार, लिव्हर सोरासीस, मतिमंद, ऑप्टिक ऍट्रोफी, आरपी, ऑप्टिक डेजिरेशन यांसारख्या दुर्धर आजरातून कायमस्वरूपी मुक्त झालेल्या रुग्णांनी रुग्ण मेळाव्यात सहभाग घेतला. सर्व रुग्णांनी त्यांना झालेले आजार आणि आयुर्वेद मेडिसीनल प्लांट स्टेम सेल थेरपी याच्या माध्यमातून करण्यात आलेला इलाज याविषयीचे अनुभव सांगितले.

रूग्णालयास मदत करण्याचे आश्‍वासन
आयुर्वेद मेडिसीनल प्लांट स्टेम सेल थेरपी ही उपचार पद्धत सामान्य रुग्णांना परवडेल अशी आहे. त्यामुळे या पद्धतीचा अनेक रुग्णांना असाध्य व्याधींपासून मुक्त होण्यासाठी फायदा होणार आहे. रुग्णालयात धन्वंतरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी डॉ. खंडू पाठक यांनी सुरु केलेल्या रुग्णालय आणि उपक्रमाला शुभेच्छा देत पुढील काळात लागणारी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्‍वासन दिले. डॉ. खंडू पाठक यांनी उपस्थितांचे आभार मानले.