आता मृतांची संख्या झाली आठ
लोणावळाः मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले. त्यातील एकाचा सोमवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. प्रतीक बालाजी सरोदे (वय 18, रा. रहाटणी, पुणे) असे उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहित कड (वय 16) आणि आकाश मदने (वय 17, दोघे रा. रहाटणी, पुणे) यांचीही प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
स्विफ्ट कारमुळे झाला अपघात
फॅमिली गेट टुगेदरसाठी गेलेले बहिरट कुटुंबीय दोन कारमधून लोणावळ्याहून पुण्याकडे परत येत होते. त्यावेळी त्यांच्या एका सँट्रो कारला (एमएच 12/ई एक्स 1682) पुढच्या बाजूने विरुद्ध दिशेने आलेली स्विफ्ट कार (एमएच 14/सी एक्स 8339) धडकली. या भीषण अपघातात राजू जगन्नाथ बहिरट (वय 52), सोनाली राजू बहिरट (वय 46), जान्हवी राजू बहिरट (वय 20), जगन्नाथ चंद्रसेन बहिरट (वय 82, सर्व रा.मुंढवा) या सँट्रो कारमधील बहिरट कुटुंबियांचा मृत्यू झाला. तर संजू मोहनसिंह खुशवाह (वय 17), कृष्णा रमेश शिरसाट (वय 22), निखिल बालाजी सरोदे (वय 20, सर्व रा. रहाटणी) या स्विफ्ट कारमधील तीन तरुणांचा मृत्यू झाला. अपघातात एकूण सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रतीक बालाजी सरोदे (वय 18), आकाश मदने (वय 17) आणि रोहित कड (वय 16) हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आज सकाळी प्रतीकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.