पुणे-मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर भीषण अपघात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. हा अपघात आज रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कार्लाजवळ झाला. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की, स्विफ्ट कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मुंबईच्या दिशेने मारूती स्विफ्ट कार जात होती. कार्लाजवळ आल्यानंतर भरधाव जात असलेल्या स्विफ्ट कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या दुभाजक तोडून लेनमध्ये घुसली. त्यावेळी समोरून येणाऱ्या सँट्रो (एमएच १२ इएक्स १६८२) कारला धडक दिली. नियंत्रण सुटल्याने स्विफ्ट कार दुभाजक ओलांडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर जाऊन सँट्रोला समोरून धडकली. या भीषण अपघातात सँट्रो आणि स्विफ्ट कार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. स्विफ्टमध्ये लहान मूल असल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील मृतांची नावे अद्याप समजली नाहीत. पाऊस सरू असल्याने मदत कार्यात अडचण येत असल्याचे सांगण्यात आले.