कार चोरट्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

0

जळगाव। मुंबई, पुणे येथून महागड्या कार भाड्याने घेऊन येऊन जळगाव-जामनेर रस्त्यावर निर्जन ठिकाणी चालकाला उतरवून पसार होणार्‍या दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. भळगट यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

यांना केली होती अटक
कार चोरी प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी औरंगाबाद येथून सय्यद इम्रान सय्यद कुर्बान (वय 47, रा. औरंगाबाद), आबेदखान उर्फ गुड्डु नासिर खान (वय 34, रा. औरंगाबाद) यांना अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यांना न्यायाधीश भळगट यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही संशयिताना दुसर्‍या गुन्ह्यात मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. तो न्यायाधीश भळगट यांनी मंजूर केला आहे. कार चोरी प्रकरणात सय्यद शकील सय्यद युसूफ (वय 37, रा. बुलडाणा), महंमद एजाज जलालुद्दीन काझी (वय 49, रा. औरंगाबाद) हे दोघे चोरटेही पोलिस कोठडीत आहेत.

सात जणांची टोळी…
मुंबई, पुणे येथून महागड्या कार भाड्याने आणून निर्जन रस्त्यावर चालकाला उतरवून कार लंपास करणारी बुलडाणा आणि औरंगाबाद येथील सात जणांची टोळी असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे. त्याची चौघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर बबलू उर्फ निजाम शेख युसूफ शेख (रा. बुलडाणा), नाजीम उर्फ नम्मो युनूस बेग (रा. लोणार, जि. बुलडाणा), सय्यद समीर सय्यद युसूफ (रा.औरंगाबाद) हे अजूनही फरार आहेत.