कार-ट्रॅक्टरच्या अपघातात तीन ठार; तीन जखमी

0

नंदुरबार – तालुक्यातील पातोंडा गावाजवळ स्विफ्ट कार व विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची समोरा समोर धडक होऊन, झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी दुपारी 1 ते 2 च्या सुमारास घडली. अपघातानंतर कारने पेट घेतला होता. मृतांमध्ये आई, मुलगा व आत्याचा समावेश असून लताबाई अशोक होळकर (60, जयहिंद कॉलनी, नंदुरबार), अभिजित उद्धव जांभळे ( 35 कल्याणी पार्क, नंदुरबार) व ताराबाई उद्धव जांभळे(55) अशी त्यांची नावे आहे.

अपघातानंतर कारने घेतला पेट
तालुक्यातील नंदुरबार प्रकाशा रस्त्यावरील पातोंडा गावाजवळ काल रविवार,7 डिसेंबर रोजी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास विटांनी भरलेला ट्रॅक्टर ( एमएच. 39 – 149) व कार (एमएच 12 – 2679) मध्ये समोरा समोर धडक झाली. अपघात झाल्यानंतर कारने पेट घेतला. त्यात कार चालक अभिजित उद्धव जांभळे हा भाजला गेला. घटनास्थळी शहादयातील माजी नगरसेवक मुकेश चौधरी यांनी मदत केली. येणारी जाणारी अनेक वाहने रस्त्यात हात जोडून उभी केली. त्यात अनेकांनी घटना पाहून तेथून काढता पाय घेतला. त्यांनी व त्यांच्या पत्नीने अपघातग्रस्तांना वाहतून बाहेर काढण्यात जिकरीचे प्रयत्न केले. त्यांनीच त्यांच्या नातेवाईकांना कळविले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पेट घेतलेली कारची आग नंदुरबार नगर परिषदेच्या अग्निशमन बंब द्वारे विझवण्यात आली. जखमींना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघातात ट्रॅक्टरचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील चाक पूर्णपणे निखळून पडले होते. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने नंदुरबार शहरात शोककळा पसरली आहे.

अपघातात चार जण जखमी
जखमींमध्ये स्वाती अभिजित जांभळे (30, कल्याणी पार्क , नंदुरबार), दुर्गेश्‍वरी अभिजीत जांभळे ( 7, कल्याणी पार्क, नंदुरबार), आकाबाई भिल (55, नवापूर चौफुली , नंदुरबार) सुरेखा मक्कन कोकणी (30, नवापूर चौफुली नंदुरबार) यांचा समावेश आहे. हा अपघात पातोंडा ते कोळदा गावाच्या वळण रस्त्यावर झाला. गेल्या वर्षभरात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघात झाले, असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.